बहुमताची खात्री झाल्यानंतर होणार पदाधिकारी बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:16+5:302021-05-08T04:25:16+5:30
कोल्हापूर : ‘गोकुळ’मुळे बदलेल्या राजकीय संदर्भाचा अंदाज घेऊन आणि बहुमतामध्ये कोणताही बदल झालेला ...

बहुमताची खात्री झाल्यानंतर होणार पदाधिकारी बदल
कोल्हापूर : ‘गोकुळ’मुळे बदलेल्या राजकीय संदर्भाचा अंदाज घेऊन आणि बहुमतामध्ये कोणताही बदल झालेला नाही याची खात्री करूनच जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना आज, शनिवारी बैठक घेण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी सूचना दिल्या आहेत.
‘गोकुळ’ निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल करणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ‘गोकुळ’च्या नवीन संचालकांची बैठक मुश्रीफ आणि पाटील यांनी शुक्रवारी सकाळी वैद्यकीय महाविद्यालयात घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी बदलाचाही विषय निघाला.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत विनय कोरे हे मुश्रीफ आणि पाटील यांच्यासोबत आले तर या दोघांसमवेत जिल्हा परिषदेत असलेले सत्यजित पाटील हे विरोधकांकडे गेले. राजू शेट्टी यांनीही महाडिक, पी. एन. पाटील यांच्या आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे शेट्टी, सत्यजित पाटील या बदलामध्ये काय करणार हे स्पष्ट करून घेण्यात येणार आहे. म्हणूनच सत्यजित पाटील यांच्यासोबत चर्चा करण्याच्या सूचना दोन्ही मंत्र्यांनी आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांना केल्या आहेत. कोरे यांना मुश्रीफ, पाटील यांना सोबत घेतल्याने सत्यजित पाटील यांनी त्यांची साथ सोडली आणि सत्तारूढ गटातून गोकुळच्या रिंगणात असलेल्या त्यांच्या मातोश्रींचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी ही बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत जे घटक पक्ष आणि गट सोबत आहेत त्यांच्या नेत्यांशी चर्चा करूनच खात्री झाल्यानंतर विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जाणार आहेत.
चौकट-
पी.एन., विनय कोरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
आमदार पी. एन. पाटील सध्या जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीसोबत आहेत. ‘गोकुळ’मध्ये पाटील यांच्या आघाडीचा सपाटून पराभव झाल्यामुळे पदाधिकारी बदलामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यांनी गेल्यावर्षी पदाधिकारी निवडीवेळी आपले चार सदस्य गोव्यातून माघारी बोलावून खळबळ उडवून दिली होती. मात्र, ते निवडीवेळी महाविकास आघाडीसोबत राहिले. विनय कोरे जरी जिल्हा परिषदेत भाजपसोबत असले तरी ‘गोकुळ’मध्ये ते दोन्ही मंत्र्यांसमवेत राहिले. त्यामुळे या दोघांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत.