चंदनापुरीचा अजिंक्य !
By Admin | Updated: July 1, 2015 00:43 IST2015-07-01T00:43:07+5:302015-07-01T00:43:07+5:30
सुवर्णक्षण : क्रिकेट क्षितिजावर झळकले नगरचे नाव

चंदनापुरीचा अजिंक्य !
रियाज सय्यद - संगमनेर -झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा २३ वा नवोदित युवा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेचे नाव कोरले गेले. चंदनापुरीसारख्या छोट्याशा खेडेगावातून आलेल्या रहाणे कुटुंबासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला. त्यामुळे चंदनापुरी तसेच नगर जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे.
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरीपासून पूर्वेला कच्चा मातीचा रस्ता जातो रहाणे यांच्या शेतातील जुन्या पडवीवजा कौलारू घराकडं. याच घरात अजिंक्यचे वडील मधुकर व त्यांचे मोठे भाऊ सीताराम आई-वडिलांसह राहत. मधुकर रहाणेंचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. चंदनेश्वर विद्यालयात १९७८-७९ साली ते दहावीत पहिले आले. पुढे मुंबईला गेले. ६ जून १९८८ रोजी अजिंक्यचा जन्म आश्वी खुर्द येथे झाला. नावाप्रमाणे क्रिकेटमध्ये तो नेहमी ‘अजिंक्य’ ठरला. लहानपणी खेळाची आवड असल्याने दिवस-दिवसभर तो क्रिकेटच्या मैदानावर असायचा. ३ सप्टेंबर २०११ ला भारतीय क्रिकेट संघात अजिंक्यचा समावेश होताच चंदनापुरीत मोठा जल्लोष झाला होता. गावाने मिरवणूक काढून अजिंक्यचा सत्कार केला. रहाणे यांनी शेतातच ‘झेलू’ नावाचा छोटेखानी बंगला बांधला आहे. सण, उत्सव, समारंभ, यात्रेला रहाणे कुटुंब गावी येतं. गावी ‘अजिंक्य’ची आजी झेलूबाई व चुलते सीताराम रहाणे राहतात. झेलूबाई रहाणे (वय ८५) थकल्या आहेत, पण अजिंक्यबद्दल विचारताच ताडकन् उठून बसत आपल्या नातवाचे गोडवे गाऊ लागतात.
२९ जून २०१५ चा सूर्य सुवर्णक्षण घेऊन आला. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अजिंक्यची संघाच्या कर्णधारपदी निवड झाली अन् चंदनापुरीकरांच्या आनंदाला उधाण आले. फटाक्यांच्या आतषबाजीत पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
अजिंक्यचा आमाला लई आनंद झालाय. मी मूळबाईला गेले. पेढं वाटून आले. मंदिराच्या पेटीत पैसे टाकले. त्येला चांगलं ठेवं, असं देवाकडं मागितलं.
- झेलूबाई रहाणे, आजी