हत्तरकींच्या वारसालाच संधी !

By Admin | Updated: January 14, 2015 00:40 IST2015-01-14T00:16:49+5:302015-01-14T00:40:13+5:30

गडहिंग्लज तालुका : बाळासाहेब पाटील, बी. एन. नंदनवाडे, रामराजेदेखील प्रयत्नशील

The chance for the success of the latter! | हत्तरकींच्या वारसालाच संधी !

हत्तरकींच्या वारसालाच संधी !

राम मगदूम - गडहिंग्लज -‘गोकुळ’चे सर्वेसर्वा आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी हयातभर एकनिष्ठ राहिलेले स्व. राजकुमार हत्तरकी यांच्या वारसालाच सत्ताधारी पॅनेलमधून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. हत्तरकींच्या पत्नी रेखाताई यांना की त्यांचे सुपुत्र सदानंद यांना संधी मिळणार याचीच उत्सुकता हत्तरकीप्रेमींत आहे. तद्वतच माजी संचालक बाळासाहेब पाटील-औरनाळकर, राष्ट्रवादी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर, महाडिक यांचे निकटवर्ती वसंत नंदनवाडे व रामराजे कुपेकर हेदेखील उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
हत्तरकींच्या पश्चात त्यांचे सुपुत्र सदानंद यांना ‘स्वीकृत’ करून घ्यावे म्हणून हत्तरकी गटाने प्रयत्न केले. मात्र, ते न घडल्यामुळे ‘सदानंद’ यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, संचालक मंडळातील विद्यमान महिला प्रतिनिधी बदलायचे ठरल्यास हत्तरकींच्या पत्नी रेखाताई यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
१९८७ मध्ये गडहिंग्लज तालुक्याला संचालकपदाच्या दोन जागा मिळाल्या. त्यावेळी अगदी शेवटच्या घटकेला तत्कालीन विद्यमान संचालक औरनाळकर-पाटील यांना डावलून हत्तरकींना संधी देण्यात आली. महाडिक गटातर्फे हत्तरकी, तर कुपेकर गटातर्फे तानाजीराव मोकाशींना संधी मिळाली. तेव्हापासून हत्तरकींनी सलग २४ वर्षे संचालक, तर दोनवेळा अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. हत्तरकी यांच्या पश्चात आपल्याला पुन्हा संधी मिळावी यासाठी औरनाळकर-पाटील हेदेखील प्रयत्नशील आहेत. मागासवर्गीय गटातून उमेदवारी मिळावी यासाठी नंदनवाडे हेदेखील प्रयत्नशील आहेत. ‘गोकुळ’चे आजपर्यंतचे राजकारण लक्षात घेतल्यास काहींही घडू शकते, असा सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळेच सत्ताधारी पॅनेलमध्ये ‘गडहिंग्लज’मधून कुणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

‘गडहिंग्लज’मधून यांना मिळाली संधी
* स्व. कॅप्टन दीपकराव शिंदे-नेसरीकर हे १९७८ ते १९८२ अखेर शासन नियुक्त संचालक होेते. १९८२ च्या निवडणुकीत गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तिन्ही तालुक्यांचे प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब पाटील-औरनाळकर हे निवडून गेले होते. १९८७ ते ९२ या कालावधीत तानाजीराव मोकाशी व राजकुमार हत्तरकी या दोघांना संचालकपदाची संधी मिळाली. १९८७ ते २०१३ अखेर २६ वर्षे हत्तरकींनी संचालकपद भूषविले.


‘गडहिंग्लज’ला पुन्हा दोन जागा मिळू शकतात !
१९८७ मध्ये गडहिंग्लज तालुक्याला दोन जागा मिळाल्या होत्या. त्याप्रमाणे हत्तरकींच्या उमेदवारीशिवाय लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजयात चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा हातभार मोलाचा असल्यामुळे स्व. कुपेकरांचे निष्ठावंत कार्यकर्ते बी. एन. पाटील-मुगळीकर यांना उमेदवारी मिळावी, असा आग्रह राष्ट्रवादीतर्फे धरला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत संध्यादेवी कुपेकरांच्या पाठीशी खंबीरपणे राहिल्यामुळे रामराजे कुपेकर यांचेही नाव पुढे येऊ शकते. खासदार महाडिक, आमदार कुपेकर व मुश्रीफ यांनी आग्रह धरल्यास यावेळीही ‘गडहिंग्लज’ला पुन्हा दोन जागा मिळू शकतात.

Web Title: The chance for the success of the latter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.