‘सभापती’विनाच गडहिंग्लजचा ‘कारभार’

By Admin | Updated: January 16, 2015 00:15 IST2015-01-15T23:50:57+5:302015-01-16T00:15:29+5:30

निवडी न्यायप्रविष्ट : समित्यांच्या कामाला पडताहेत मर्यादा; पुन्हा निवडणुकीची शक्यता

'Chairperson' is the only 'responsibility' of Gadhinglaj | ‘सभापती’विनाच गडहिंग्लजचा ‘कारभार’

‘सभापती’विनाच गडहिंग्लजचा ‘कारभार’

राम मगदूम -गडहिंग्लज -गडहिंग्लज नगरपालिकेतील बांधकाम व नगरविकास, वाचनालय व शिक्षण आणि महिला व बालकल्याण या तीनही समित्यांच्या निवडी न्यायप्रविष्ट आहेत. सदस्य निवडी होऊन समित्यांची रचना झाली असली तरी ‘सभापति’पदेच रिक्त असल्यामुळे या समित्यांशी संबंधित कामाला मर्यादा येत आहेत.
२२ डिसेंबर २०१४ रोजी पालिकेतील विषय समित्यांच्या निवडी पार पडल्या. मात्र, एका सदस्याने दोन समित्यांच्या सभापतिपदाच्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्यामुळे बांधकाम व वाचनालय या दोन समित्यांच्या सभापतिपदाच्या उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली. याच नियमानुसार महिला व बालकल्याण सभापतींची झालेली निवड रद्द करण्याची मागणी झाली आहे.
याप्रश्नी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही नगररचना संचालकांकडे दाद मागितली आहे. त्याचा अद्याप निकाल लागलेला नाही. दरम्यान, विषय समित्यांच्या सभापती निवडी न्यायप्रविष्ट असल्यामुळे संबंधित समित्यांसह स्थायी समितीची सभा घेऊ नये, अशी मागणी विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केल्यामुळे समित्यांच्या सभा घेण्यात कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
न्यायप्रविष्ट बाबीमुळे विषय समित्यांच्या सभा घेण्यात कायदेशीर अडचणी असल्यामुळे या समित्यांशी संबंधित सर्व कामांचे विषय थेट स्थायी समितीकडे व त्यानंतर सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवले जाू शकतात. मात्र, लोकशाहीतील संकेत व अधिनियमातील तरतुदीनुसार विषय समिती, स्थायी समिती व त्यानंतरच सर्वसाधारण सभेपुढे विषय जाणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे न्यायप्रविष्ट सभापती निवडींचा निकाल त्वरित लागणे आवश्यक आहे.
मे महिन्यात होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेचे नियोजन, फेब्रुवारी महिन्यातील पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक, बांधकाम समितीच्या अखत्यारितील किरकोळ कामे, वाचनालयाची गं्रथ खरेदी व सांस्कृतिक उपक्रम आणि महिला व बालकल्याण समितीतर्फे दरवर्षी जागतिक महिला दिनी राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रम-उपक्रमांच्या नियोजनामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
‘सभापति’पदाच्या पुन्हा निवडणुका ?
गतनिवडीवेळी बांधकाम व वाचनालय या दोन्ही सभापतिपदांच्या उमेदवारांचे अर्ज छाननीतच अवैध ठरले. त्यामुळे या सभापतिपदांच्या रिक्त जागांसाठी पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

एक ‘सभापति’पद विरोधकांना?
नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीचे ९, तर विरोधी जनता दल-जनसुराज्य-काँगे्रस आघाडीचे ८ नगरसेवक आहेत. विरोधी आघाडीतून निवडून आलेले जनसुराज्यचे नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांनी ३ वर्षे सत्ताधाऱ्यांना साथ दिल्यामुळे सर्व समित्यांची सभापतिपदे राष्ट्रवादीकडेच राहिली. मात्र, सध्या भद्रापूर हे पुन्हा स्वगृही परतले आहेत. त्यामुळे सभागृहातील बलाबल लक्षात घेता बांधकाम व वाचनालय यापैकी एक सभापतिपद विरोधकांना मिळू शकते.

Web Title: 'Chairperson' is the only 'responsibility' of Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.