‘उत्सव भारतीय संस्कृतीचा’ --संस्कृती, मातृशक्ती, कृषिप्रधानता, बलशाली भारताचे प्रतिबिंब : काडसिद्धेश्वर स्वामीजी
By Admin | Updated: January 14, 2015 23:50 IST2015-01-14T22:13:18+5:302015-01-14T23:50:57+5:30
श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्याशी साधलेला थेट संवाद...

‘उत्सव भारतीय संस्कृतीचा’ --संस्कृती, मातृशक्ती, कृषिप्रधानता, बलशाली भारताचे प्रतिबिंब : काडसिद्धेश्वर स्वामीजी
धार्मिक स्थळांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जावे, अशी व्यवस्था विविध राजेशाही व अगदी कोल्हापूरच्याही संस्थानकाळात केली गेली. आता मात्र धार्मिक स्थळ हे केवळ अध्यात्म, देवधर्म करणारे संस्थान अशी एक धारणा असते. याला अपवाद म्हणजे कणेरी गावातील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ. सामाजिक, गो-परिक्रमा, गरीब रुग्णांवर मोफत उपचार, शाळांचे पालकत्व, सेंद्रीय शेती, अनाथालय... महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती प्रतिवर्तित करणारे म्युझिअम अशा उपक्रमांचे पुढचे पाऊल म्हणजे १८ ते २५ तारखेदरम्यान होणारे भारतीय संस्कृती उत्सव. गावांचा विकास, स्वावलंबी परिवार, स्त्रीशक्तीचा सन्मान, युवाज्ञानोत्सव, शेतीतील नवनवे प्रयोग... या सगळ्यांचा ऊहापोह करतानाच सांस्कृतिक देखाव्यांच्या माध्यमातून भारताची महानता दर्शविणाऱ्या उत्सवाच्या निमित्ताने या उत्सवाचे सर्वेसर्वा आणि श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्याशी साधलेला थेट संवाद...
प्रश्न : भारतीय संस्कृती उत्सव ही संकल्पना आपल्याला कशी सुचली?
उत्तर : ग्रामीण जीवन आणि उत्सवांची मांडणी असलेल्या म्युझिअमचा आता नावलौकिक झाला आहे. गतवर्षी झालेल्या एका कार्यक्रमात विधायक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे सर्व प्रतिनिधी एकमेकांच्या संपर्कात आले. उज्ज्वल भवितव्यासाठी काम करणाऱ्या सगळ्या संस्थांची मिळून ‘भारत विकास संगम’ नावाची संस्था रजिस्टर केली. शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग, संस्कृती या चार प्रमुख घटकांवर भारताचे बलशाली भवितव्य अवलंबून असणार आहे. त्या सगळ्यांचे प्रतिबिंब उमटणारा उत्सव म्हणून ‘भारतीय संस्कृती उत्सव’ ही संकल्पना सुचली.
प्रश्न : या उत्सवाची मांडणी आणि त्यात कोणकोणत्या विभागांचा समावेश असणार आहे?
उत्तर : कोल्हापूरला लाभलेले राजर्षी शाहू महाराज यांच्याच नावे ही संस्कृती उत्सवनगरी वसविली आहे. भारताची महानता तिच्या सांस्कृतिकतेत दडली आहे. ज्ञानी ऋषिमुनी, आयुर्वेद, पंचकर्म (आरोग्य), गुरुकुल पद्धती, गो-संवर्धन, शेती प्रधानतेची आयुधे लाभली आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान तर देशाच्या पौराणिक कालखंडात मांडला आहे. या सगळ्यांचे दर्शन भारतीय संस्कृती उत्सवात देखाव्यांच्या रूपात मांडण्यात आले आहे. फक्त देखावेच नाहीत, तर वरील विषयांवर आजच्या सामाजिक गरजांनुरूप चर्चा, परिसंवाद, देशभरातील मोठ्या मान्यवरांचे मार्गदर्शनही होणार आहे. वारकरी उत्सवात एक लाख वारकरी सहभागी होणार आहेत.
प्रश्न : मठाच्यावतीने राबविले जाणारे अन्य उपक्रम कोणते?
उत्तर : सिद्धगिरी मठाच्या देशात साडेतीनशे शाखा आहेत. कोल्हापूर हे मुख्य केंद्र. आपल्याकडे सेंद्रीय पद्धतीने शेती केली जाते. गोशाळेत तेवीस जातींच्या सातशे देशी गाई आहेत. अनाथ मुलांसाठी ‘आनंदाश्रम’ ही संस्था चालविली जाते, ज्यात ७०-८० विद्यार्थी आहेत. आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांवर माफत दरात आणि अनेकदा मोफत उपचार केले जातात. पोलिओ सर्जरीदेखील केली जाते. सुशिक्षित पिढी निर्माण व्हावी, यासाठी ‘विद्याचेतना’ या उपक्रमात करवीर तालुक्यातील ३० गावांमधील मराठी शाळा दत्तक घेण्यात आल्या आहेत. गो-परिक्रमा या अंतर्गत वर्षाला शंभर गावांमधून परिक्रमा केली जाते. गायींचे प्रदर्शन मांडले जाते.
प्रश्न : या उत्सवातून आपला उद्देश सफल होईल, असे वाटते का?
उत्तर : या उत्सवामुळे कोल्हापूरसारख्या शहरात पर्यटन वाढेल, शाहू महाराजांची कीर्ती देशभरात पोहोचेल. कोल्हापूरचे नाव पर्यटनाच्या नकाशावर येईल. सेंद्रीय पद्धतीने ‘लखपती शेती’सारखा प्रयोग शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शक असणार आहे. आपण अनेकदा पाश्चिमात्य देशांच्या विज्ञानापासून संस्कृतीपर्यंत सगळ्यांचे आचरण करतो; पण भारताला लाभलेली परंपरा त्याहून श्रेष्ठ आहे, जिचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. सात दिवस चालणारा हा उत्सव म्हणजे आपल्याला लाभलेल्या समृद्ध वारशाचा आणि भविष्यात कराव्या लागणाऱ्या वाटचालीचे विचारमंथन असणार आहे.
प्रश्न : उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही नागरिकांना काही आवाहन कराल का?
उत्तर : गेल्या सहा महिन्यांपासून उत्सवाची तयारी करतो आहे. यासाठी आर्थिक सहकार्यासोबत फार मोठे मनुष्यबळही लागणार आहे. त्यासाठी अगदी शालेय विद्यार्थ्यांनी आपले खाऊचे पैसेही आम्हाला देऊ केले आहेत. नगरसेवकांचे मानधन, शहरातील दानशूर व्यक्तींकडून देणगी, विविध महाविद्यालयांच्या मुलांचे कॅम्प, नागरिकांचे श्रमदान अशा अनेक पातळ्यांवर मदतीसाठी हात पुढे आले आहेत. उत्सवात दिवसाला किमान एक लाख लोक भेटी देणार आहेत. त्यांच्या निवासापासून ते जेवणापर्यंतच्या सोयी कराव्या लागणार आहेत. कोल्हापूरकरांनी या उत्सवाला भरभरून साथ द्यावी, हीच अपेक्षा.
- इंदुमती गणेश