सिंधुदुर्गात पकडले, आजऱ्यात कुठे अडल
By Admin | Updated: February 13, 2015 00:57 IST2015-02-12T23:32:41+5:302015-02-13T00:57:36+5:30
हत्ती पकड मोहीम : आजरा-चंदगड तालुकावासीयांना उत्सुकतो

सिंधुदुर्गात पकडले, आजऱ्यात कुठे अडल
ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -सिंधुदुर्गातील नानेली व निवजे येथील दोन रानटी हत्ती प्रशिक्षित हत्तींच्या साहाय्याने पकडण्यात वनविभागाला यश आले असल्याने आजरा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या सहा हत्तींबाबत काय उपाययोजना करणार? याकडे आजऱ्याह चंदगड तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे. ८ मार्च २०१२ रोजी चंदगड कानूरच्या दिशेने जात हत्तींनी आजरा तालुक्यातील सुुळेरान, हाळोली, मसोली येथील पिके व फळझाडांचे नुकसान केले व पुन्हा हत्ती चंदगडच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर ३ डिसेंबर २०१२ रोजी पाच हत्तींचा कळप आवंडी, किटवडे, धनगरमोळा, सुळेरान वनक्षेत्रात दाखल झाला. येथून आजरा तालुक्यात जे नुकसानसत्र सुरू आहे, ते अद्याप कायम आहे. मसोली, लाटगाव, इटे, रायगवाडा, खानापूर, पोळगाव, एरंडोळ या भागाला प्राधान्याने लक्ष्य बनवत नुकसानीची मालिका सुरू ठेवली.हत्तींनी भात, ऊस, मेसकाठी, नारळ, केळी बागा, काजूची झाडे यांचे प्रचंड नुकसान केले आहे. वनखात्याच्या पंचनाम्यानुसार सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान हत्तींकडून वर्षभरात झाले आहे. प्रत्यक्षात वनखात्याकडे नुकसानीची न दाखल झालेली प्रकरणे विचारात घेतल्यास हा नुकसानीचा आकडा कितीतरी जास्त आहे. सुदैवाने हत्तींच्या हल्ल्यात जीवितहानी झालेली नाही.
सद्य:स्थितीत आजरा-चंदगड तालुक्याच्या वनहद्दीत सहा हत्तींचा वावर आहे. यापैकी पाच हत्ती चंदगड-आजरा सीमेवर, तर एक हत्ती भुदरगड-आजरा तालुक्याच्या सीमेवर वावरत आहे. वनखात्याने वेळोवेळी हत्ती हटाव मोहीम राबवली; पण यामध्ये फारसे यश आले नाही.
वनखात्याच्या म्हणण्यानुसार हत्ती पकडून दुसरीकडे स्थलांतरित केल्यास दुसरा कळप येथे दाखल होण्याची शक्यता अधिक असल्याने हत्ती पकडणे अथवा हाकलून लावण्यापेक्षा ते जिथे वास्तव्यास आहेत, तिथेच त्यांना बाळगणे योग्य आहे.
वनखात्याचे म्हणणे असे असले तरीही पुढचे पुढे बघू. प्रथम तालुक्यातील हत्तींचा बंदोबस्त करा, अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे. वनखात्याने सिंधुदुर्ग येथील हत्ती पकडण्याच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातून असा कोणताही प्रस्ताव अद्याप तयार केलेला अथवा पाठवलेला नाही. त्यामुळे आजरा-चंदगड तालुक्यांत अशी कोणतीही मोहीम राबविली जाण्याची शक्यता नाही.
त्यामुळे आता हत्ती येतील. त्यांचे स्वागतच करा. नुकसान करतील त्याचे पंचनामे करा. एकंदर आता हत्ती बाळगा, असा प्रत्यक्ष संदेश वनखाते देत आहे.
६ हत्ती, २०० गवे, २ बिबटे, १ ब्लॅक पँथर
आजरा तालुक्यात सहा हत्ती, दोन बिबटे, एक ब्लॅक पँथर व सुमारे २०० गव्यांचा वावर असल्याचे वनखात्याकडून सांगण्यात येते. हत्तींचा वावर कधी चंदगड, कधी आजरा, तर कधी भुदरगड तालुक्यात आहे; तर बिबट्याचा राजरोस वावर दिसतो.