कबनुरात महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:23+5:302021-05-01T04:23:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा ...

कबनुरात महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील महिला सरपंचास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात घडला. याबाबतची तक्रार सरपंच शोभा शंकर पोवार (वय ४४, रा. तिरंगा कॉलनी) यांनी दिली आहे.
शांतीनाथ बाळकृष्ण कामत, अजित बाळासाहेब खुडे व रियाज जब्बार चिकोडे (सर्व रा. कबनूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे चौदा सदस्य हे वाढत्या कोरोना व डेंग्यू रोगाच्या उपाययोजना संदर्भात ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेतली. त्यावेळी वरील संशयितांनी बैठक सुरू असताना कार्यालयामध्ये घुसून आम्ही बैठकीला उपस्थित राहणार आहे, असे सांगितले.
आम्हाला कोण बाहेर काढते ते बघून घेतो, असे म्हटले. यावेळी सरपंच पोवार यांनी, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असून, तुम्ही दोन मिनिटे बाहेर बसा, असे सांगितले. यावर शांतीनाथ यांनी पोवार यांना जातीवाचक शिवीगाळ करून कार्यालयामध्ये सर्वांसमोर अपमानास्पद बोलले. दरम्यान, उपसरपंच उत्तम पाटील यांनी भाषा सांभाळून बोला, असे बोलताच त्यांनाही शिवीगाळ केली. अजित व रियाज यांनी सदस्य प्रवीण जाधव, सईफ मुजावर व सुनील काडाप्पा यांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.