अनुदान न मिळाल्यास बँकेचे व्यवहार बंद पाडणार
By Admin | Updated: March 9, 2017 18:58 IST2017-03-09T18:58:12+5:302017-03-09T18:58:12+5:30
हसन मुश्रीफ यांचा इशारा : कागल तालुका राष्ट्रवादीचे आंदोलन

अनुदान न मिळाल्यास बँकेचे व्यवहार बंद पाडणार
अनुदान न मिळाल्यास बँकेचे व्यवहार बंद पाडणारहसन मुश्रीफ यांचा इशारा : कागल तालुका राष्ट्रवादीचे आंदोलन
कोल्हापूर : कागल तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, इंगांयो योजनेतील लाभार्थ्यांना आय.सी.आय.सी.आय. बँकेकडून फिनोपेटेक कंपनीमार्फत अनुदान दिले जाते. शासनाकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा असताना ते लाभार्थ्यांना वेळेत दिले जाते नाही. हे अनुदान तत्काळ देऊन बॅँकेने आपल्या कारभारात महिन्यात सुधारणा करावी, अन्यथा जिल्ह्यातील आय.सी.आय.सी.आय. बँकेचे सर्व व्यवहार बंद पाडू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी बँकेचे जनरल हेड गोपाळ उन्हाळे यांना दिला.
कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गुरुवारी सकाळी आय.सी.आय.सी. आय. बँकेच्या कोल्हापुरातील बागल चौक शाखेसमोर आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी शिष्टमंडळाने बँकेचे जनरल हेड उन्हाळे यांची भेट घेतली.
आय.सी.आय.सी.आय. बँकेकडून संजय गांधी, श्रावणबाळ, इंगांयो योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटपाचे काम फिनोपेटेक कंपनीकडे दिले आहे. मात्र अनुदान वाटप करणारे कर्मचारी लाभार्थ्यांना उद्धट उत्तरे देतात, अनुदान घेण्यासाठी घरी बोलावतात. विनाकारण हेलपाटे मारवायास भाग पाडतात. आधार कार्डाचे अंगठे जुळत नाहीत, अशी कारणे पुढे करतात. पे-लिस्टवर रक्कम असूनही बायोमेट्रिक मशीनवर लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम नसणे अशी अनेक कारणे पुढे करून अनुदान दिले जात नाही. खात्यावर पैसे असूनसुद्धा हजारो लाभार्थ्यांना सहा-सहा महिने अनुदान मिळत नाही. त्यामुळे हा पैशांचा वापर बँक करीत असल्याचा आरोपही यावेळी आमदार मुश्रीफ यांनी केला.
लाभार्थ्यांमध्ये ६५ वर्षांवरील निराधार स्त्री, पुरुष, अंध, अपंग, विधवा, परित्यक्ता, अनाथ मुलांचा समावेश आहे. या प्रकारामुळे लाभार्थ्यांच्या उपजीविकेचा व औषधोपचारांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे सर्व प्रकार तत्काळ थांबवावेत व फिनोपेटेक कंपनीकडून हे काम काढून घ्यावे; अन्यथा, बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांतील व्यवहार बंद पाडले जातील, असा इशाराही शिष्टमंडळाने यावेळी दिला.
आंदोलनात जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शिवानंद माळी, संजय गांधी योजना समितीचे माजी अध्यक्ष भैया माने, महिला अध्यक्ष मनीषा पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज फराकटे, नगराध्यक्ष माणिक माळी, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विकास पाटील, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, सभापती शशिकांत खोते, संजय हेगडे, प्रकाश गाडेकर, बाळासो तुरंबे, रमेश तोडकर, राजेंद्र माने, आदी उपस्थित होते.
-----------------
अधिकाऱ्यांना धारेवर धरले
आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह कागल येथील मोठ्या प्रमाणातील कार्यकर्ते आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या कोल्हापुरातील बागल चौक शाखेसमोर आले होते. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हसन मुश्रीफ यांनी यावेळी बँकेतील अधिकाऱ्यांना प्रलंबित लाभार्थ्यांच्या अनुदानाबाबत चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तुम्ही गरिबांचे अनुदान देत नाही. तुमचा एक महिन्याचा पगार दिला नाही तर काय करणार? अशी थेट विचारणा यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना केली.