उघड्यावर जैविक कचरा टाकल्याप्रकरणी डॉ. भाट यांना पाच हजार रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:47+5:302021-01-21T04:23:47+5:30
इचलकरंजी : येथील आरगे भवन परिसरात उघड्यावर जैविक कचरा टाकल्याप्रकरणी डॉ. नितीन भाट यांना नगरपालिकेने पाच हजार रुपये दंड ...

उघड्यावर जैविक कचरा टाकल्याप्रकरणी डॉ. भाट यांना पाच हजार रुपये दंड
इचलकरंजी : येथील आरगे भवन परिसरात उघड्यावर जैविक कचरा टाकल्याप्रकरणी डॉ. नितीन भाट यांना नगरपालिकेने पाच हजार रुपये दंड केला आहे. त्याचबरोबर पुन्हा असा प्रकार घडल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही दिला.
आरगे भवन परिसरातील काळ्या ओढ्याजवळ मोठ्या प्रमाणात इंजेक्शनच्या सुया, सिरिंज, वापरलेल्या गोळ्यांची पाकिटे, पीपीई किट असा जैविक कचरा उघड्यावर टाकल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत होता. याठिकाणी बुधवारी आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी पाहणी केली असता, या साहित्यामधील एका औषधाच्या चिठ्ठीवरील नावावरून डॉ. नितीन भाट यांच्या रुग्णालयातून हा कचरा टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मुख्याधिकारी संतोष खांडेकर व डॉ. संगेवार यांच्या आदेशानुसार प्रभाग स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ, सर्जेराव माने व प्रभाकर जावळे यांनी भाट यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच हा कचरा जेसीबीच्या सहाय्याने काढून परिसराची स्वच्छता करण्याचे आदेश दिले.
(फोटो ओळी)
२००१२०२१-आयसीएच-०७
आरगे भवन परिसरातील काळ्या ओढ्याजवळ उघड्यावर टाकलेल्या जैविक कचऱ्याची डॉ. सुनीलदत्त संगेवार व प्रभाग स्वच्छता निरीक्षकांनी पाहणी केली.