पाच माध्यमिक शिक्षकांची बदली रद्दचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:29+5:302020-12-15T04:40:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पाच माध्यमिक शिक्षकांची जूनमध्ये झालेली बदली रद्द करून शासन निर्णयातील धोरणांनुसारच ही ...

पाच माध्यमिक शिक्षकांची बदली रद्दचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पाच माध्यमिक शिक्षकांची जूनमध्ये झालेली बदली रद्द करून शासन निर्णयातील धोरणांनुसारच ही प्रक्रिया राबवावी, असे आदेश ग्रामविकास विभागाने देऊनही जिल्हा परिषद त्यानुसार कार्यवाही करण्यास तयार नसल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. हे शिक्षक बदलीविरोधात न्यायालयात गेल्याने ही बाब न्यायप्रविष्ट झाल्याने निर्णय घेणे योग्य होणार नाही, असे ग्रामविकास विभागास कळविणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी सांगितले.
सहाय्यक शिक्षक रियाज मुल्ला, सचिन पेडणेकर, सुनील लोखंडे, शीतल पत्रावळे आणि अनिल लाड यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या शाळा गडहिंग्लज, गगनबावडा, शिंगणापूर आणि कोल्हापुरात आहेत. शासन निर्णयानुसार प्रशासकीय बदल्यांतून माध्यमिक शिक्षकांना वगळले आहे परंतु जिल्हा परिषदेने ४ जून २०१९ला त्यासंबंधीचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करून बदल्या केल्या. या चार माध्यमिक शाळांतील शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच शाळेत झाली आहे. अशांची बदली करण्यात यावी, असे ठरावात म्हटले आहे. त्याविरोधात महसूल आयुक्त व ग्रामविकास विभागाकडे तक्रार केली. ग्रामविकास विभागाने आदेशही दिले परंतु तरीही जिल्हा परिषद त्यानुसार कार्यवाही करण्यास तयार नसल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे.
(विश्वास पाटील)