वस्त्रोद्योगाला गुंडगिरीची कीड
By Admin | Updated: November 11, 2014 23:25 IST2014-11-11T21:32:41+5:302014-11-11T23:25:27+5:30
विकास खुंटल्याची भीती : पाच वर्षांत नवीन उद्योगाची उभारणी नाही

वस्त्रोद्योगाला गुंडगिरीची कीड
राजाराम पाटील - इचलकरंजी -वस्त्रनगरीचा विकास झाला, आधुनिक यंत्रे वस्त्रोद्योगात आली आणि त्याबरोबर कापड उत्पादनातही वाढ झाली. परिणामी, येथील वस्त्रोद्योगाची रोजची उलाढाल १५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. अशा वस्त्रोद्योगाला मात्र, गुंडगिरीची कीड पोखरू लागल्याने उद्योजक-व्यावसायिकांतून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. वस्त्रोद्योगाला सर्व सुविधा असतानाही गेल्या पाच वर्षांत येथे एकाही बड्या उद्योगाची उभारणी झाली नाही. त्यामुळे येथील विकास खुंटण्याची भीती आहे.
एकविसाव्या शतकाच्या पदार्पणावेळी जागतिक स्पर्धेचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खुल्या आर्थिक धोरणाचे वारे जोरदारपणे वाहू लागले. अशा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने वस्त्रोद्योगात अत्याधुनिकता आणून कापड उत्पादनवाढीसाठी तांत्रिक उन्नयन निधी (टफ्स) योजनेची अंमलबजावणी केली. तर राज्य शासनानेही २३ कलमी पॅकेज, वीज दराची सवलत, औद्योगिक वसाहतींची डी प्लस योजना, आदी सवलती व सुविधा दिल्याने सन २००४ पासून यंत्रमागांची आणि आॅटोलूमची संख्या वाढत गेली. सध्या इचलकरंजी व परिसरात सव्वालाख यंत्रमाग व २५ हजार आॅटोलूम आहेत. या मागांवर दररोज ७५ लाख मीटर कापडाची निर्मिती होते. यंत्रमाग उद्योगाबरोबर सूतगिरण्या, सायझिंग, प्रोसेसिंग, गारमेंट असे उद्योगधंदे येथे आहेत. त्यामुळे इचलकरंजीत दररोज १५० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे उद्योजक-व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
वस्त्रोद्योगात दररोज सूत व कापडविक्रीची आर्थिक उलाढाल होते. त्याचबरोबर आॅटोलूम कारखान्यांकडे मेंडींग आणि वहिफणी-नॉटींगचा ठेका मिळावा, यासाठी कारखानदाराला धमकाविले जाते. पार्वती औद्योगिक वसाहत, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटसह तारदाळ, यड्राव, शहापूर, कोरोची, आभार फाटा, गणेशनगर परिसर अशा परिसरांतील कारखानदारांना संरक्षण (?) देण्याच्या गोंडस नावाखाली मासिक हप्ता मागणीचे प्रकार वाढले आहेत. हप्ता किंवा ठेका न मिळाल्यास कारखान्यात घुसून कामगारांना मारहाण करणे, रात्रीच्यावेळी कारखान्यावर दगडफेक, सुताची बिमे कापून नुकसान करणे, असे दहशतीचे प्रकार केले जातात.
दहशतीच्या कारणांमुळे आणि स्थानिक गुंडगिरीला वैतागून बॉम्बे रेयॉनसारख्या बड्या कंपनीने लक्ष्मी औद्योगिक वसाहत व खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या त्यांच्या औद्योगिक कारखान्यांचा गाशा गुंडाळला.
तसेच अशाच कारणातून सीईटीपीवरसुद्धा दगडफेकीचे प्रकार झाले. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत इचलकरंजीत एकही नवीन उद्योग उभा राहिला नाही. त्यामुळे येथील वस्त्रोद्योगाचा विकास खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी स्थानिक गुंडगिरीच्या विरोधात मोहीम उघडून उद्योजक-व्यावसायिकांना अभय द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. (क्रमश:)
पोलिसांचा वचक नसल्याने गुंडांचे वर्चस्व
शहरात गावभाग, शिवाजीनगर व शहापूर असे तीन पोलीस ठाणे आहेत. वाहतूक पोलिसांची शाखा स्वतंत्र असून, पोलीस उपअधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचेही कार्यालय आहे. अशाप्रकारे सातत्याने सुमारे २७५ पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतानाही फाळकूटदादांचे वर्चस्व शहरात नेहमी आहे. तरीही त्यांच्यावर वचक ठेवण्यास पोलीस कमी का पडतात, याचेच आश्चर्य नागरिकांना वाटत आहे.
कणखरपणा नसल्याचा फायदा फाळकूटदादांना
आॅटोलूमच्या उद्योगात नवीन काही उद्योजक आहेत. फॅशनेबल राहणी आणि नवीन गाड्यांचा शौक करणाऱ्या या मंडळींकडे कष्टाचा अभाव आहे. तशी कणखर वृत्ती नसल्याने धमक्यांना हे ‘नवउद्योजक’ सहजासहजी बळी पडतात आणि फाळकूटदादांचे फावते. त्याचा परिणाम अन्य उद्योजकांवर होऊ
लागला आहे.
यंत्रमागांना ११० वर्षांची परंपरा
इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला ११० वर्षांची परंपरा आहे.
सन १९०४ मध्ये तत्कालीन जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी विकेंद्रीत क्षेत्रातील पहिला यंत्रमाग येथे स्थापित केला.
स्वातंत्र्योत्तर काळात येथील यंत्रमाग व्यवसायाला चालना मिळाली. सन १९६० नंतर यंत्रमागांची संख्या वाढत गेली.