सभासद शेतकऱ्यांच्या आडून सतेज पाटील यांची गुंडगिरी, अमल महाडिक यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 12:24 PM2024-01-04T12:24:20+5:302024-01-04T12:24:58+5:30

अपराधाचा घडा भरला, आता जशास तसे उत्तर

Bullying of Satej Patil in the guise of member farmers says Amal Mahadik | सभासद शेतकऱ्यांच्या आडून सतेज पाटील यांची गुंडगिरी, अमल महाडिक यांचा आरोप

सभासद शेतकऱ्यांच्या आडून सतेज पाटील यांची गुंडगिरी, अमल महाडिक यांचा आरोप

कोल्हापूर : ऊसतोड होत नाही म्हणून काढलेल्या मोर्चातील बहुतांश शेतकऱ्यांच्या उसाची तोड केलेली आहे. पण, ‘राजाराम’ साखर कारखान्याची प्रगती सतेज पाटील यांना बघवत नसल्यानेच उठाठेव सुरू आहे. यापूर्वी महाडिक गुंडगिरी करत असल्याचे सांगणारे पाटील शेतकऱ्यांच्या आडून गुंडगिरी करत असल्याचा आरोप राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार अमल महाडिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

श्रीकृष्णसुध्दा शिशुपालाच्या ९९ अपराधापर्यंत थांबले, त्याप्रमाणे आता सतेज पाटील यांचा अपराधाचा घडा भरला असून, यापुढे जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अमल महाडिक म्हणाले, सतेज पाटील यांना पराभव पचनी पडत नाही. त्यामुळेच २०१४ला विधानसभेला पराभव झाल्यानंतर ‘राजाराम’ कारखान्यावर हल्ला केला. आताही कारखान्याच्या सभासदांनी निवडणुकीत नाकारल्यानंतर पराभव पचनी न पडल्याने उठाठेव सुरू आहे. दोन वेळा कार्यकारी संचालकांना दादागिरी केली, आम्ही संयम ठेवला. कसबा बावड्यातील नोंदीत ८६० सभासदांपैकी ४२२ सभासदांच्या उसाची उचल केली आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष नारायण चव्हाण, माजी नगरसेवक सत्यजीत कदम व संचालक उपस्थित होते.

काळ्या फिती बांधून निषेध

कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना झालेल्या मारहाणीचा निषेध कर्मचाऱ्यांनी पंधरा मिनिटे काम बंद करून केला. संचालकांनी काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध नोंदवला.

त्यांच्या उसाची उचल केली, हेच ते विसरले

सतेज पाटील यांच्यासह संजय डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील, शांतादेवी डी. पाटील यांच्या नावावर नोंद करून उसाची कारखान्याने उचल केली आहे. हेच पाटील विसरल्याचा टोला महाडिक यांनी लगावला.

हिंमत असेल तर ‘त्या’ प्रश्नांची उत्तरे द्या

आमच्यावर खासगीकरणाचे आरोप करणारे सतेज पाटील यांनी ‘डी. वाय. पाटील साखर कारखाना सहकारावर चालतो का? हे सांगावे. हिंमत असेल तर आम्ही त्यांच्या कारखान्याबद्दल विचारलेल्या सहा प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत, असे आव्हान महाडिक यांनी दिले.

मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनतर्फे निषेध

महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डाटरेक्टर्स असोसिएशनने चिटणीस यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Bullying of Satej Patil in the guise of member farmers says Amal Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.