बळिराजाला पावसाची आस...
By Admin | Updated: June 29, 2014 00:49 IST2014-06-29T00:45:50+5:302014-06-29T00:49:16+5:30
खरीप करपू लागले : दहा दिवस पावसाचा थेंबही नाही; पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

बळिराजाला पावसाची आस...
कोल्हापूर : गेली दहा दिवस पावसाचा एक थेंबही पडला नसल्याने खरीप पिके करपू लागल्याने बळिराजाच्या नजरा ढगांकडे लागल्या आहेत. आणखी पाच-सहा दिवस पावसाने दडी मारली, तर दुबार पेरणीचे संकट जिल्ह्यावर येण्याची शक्यता आहे.
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत धूळवाफ पेरण्या लवकर झाल्या होत्या. गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाने एकदम सुरुवात केल्याने शेतकरी अडकला होता. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात वळीव पाऊस चांगला झाल्याने धूळवाफ पेरण्या वेळेत झाल्या.
परिणामी, खरिपाची उगवणही चांगली झाली. १९ जूनला मान्सून सक्रीय झाला. जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप ज्वारी, सोयाबीन, भूईमुगाच्या पेरण्या धूमधडाक्यात केल्या. या पिकांची उगवणही जोमात झाली. पण गेली दहा दिवस पाऊस नसल्याने विशेषत: माळरानावरील पिकांची वाईट अवस्था झाली आहे.
भात, भुईमूग, सोयाबीन या पिकांची उगवण होऊन जेमतेम आठ दिवस झाल्याने त्यांची मुळे कोवळी आहेत. ती वरच असल्याने पिके करपण्याची क्रिया वेगाने होऊ लागली आहे. उनापासून पिकाच्या मुळांचा बचाव व्हावा, यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.
कोळपणीने तयार झालेली माती पिकांच्या मूळाभोवती लावली जात आहे. जिथे पाण्याची सोय आहे, तिथे पाणी दिले जात असले तरी वीजेच्या लपंडावामुळे ही पीकेही करपू लागली आहेत.
हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ५ जुलैनंतरच पाऊस सुरू होईल. आणखी पाच-सहा दिवस पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार, हे निश्चित आहे.
पावसाने सुरुवात केल्याने मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. ही रोप लागण अडचणीत आली आहे. कावडीने पाणी आणून रोपे जगवण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. उसाची मुळे खोलवर जातात. पाण्याविना महिनाभर ऊस पीक तग धरू शकते. त्यामुळे या उघडिपीचा ऊस पिकावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. मात्र माळरानावरील शेतातील पिकांवर मात्र दुबार पेरणीचे संकट आहे. (प्रतिनिधी)