आलास येथील ऊर्दू शाळेची इमारत धोकादायक
By Admin | Updated: March 22, 2016 00:33 IST2016-03-21T23:53:38+5:302016-03-22T00:33:38+5:30
शाळेच्या दुरुस्तीची गरज : शासनाचे दुर्लक्ष; विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका, दुरुस्तीचा प्रस्तावही धूळखात

आलास येथील ऊर्दू शाळेची इमारत धोकादायक
अजित चंपुणावर -- बुबनाळ -आलास (ता़ शिरोळ) येथील जिल्हा परिषदेची ऊर्दू कुमार विद्यामंदिरची दुमजली आरसीसी इमारत धोकादायक बनली आहे़ या धोकादायक इमारतीचा निर्लेखनाचा प्रस्ताव गेल्या चार ते पाच वर्षांपासून शासन स्तरावर धूळखात पडला होता़ मात्र, सततच्या पाठपुराव्यानंतर इमारतीच्या आयुष्यमानावर हा प्रस्ताव नाकारला गेला़ तद्नंतर इमारतीचा विशेष दुरुस्तीसाठी जानेवारी २०१५ ला प्रस्ताव पाठविला आहे़ तो प्रस्तावही धूळखात पडला आहे़
येथील सय्यद सादात दर्ग्याजवळ जिल्हा परिषद ऊर्दू कुमार विद्यामंदिरचे ३० गुंठे विस्तीर्ण जागेत सन १९८८-८९ साली इंदिरा आवास योजनेंतर्गत पाच खोल्या व शैक्षणिक उठावातून ग्रामस्थांच्या देणगीतून एक खोली, अशा सहा खोल्यांचे दुमजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते़ या शाळेत सध्या पहिली ते सातवीपर्यंत १५३ विद्यार्थी शिक्षण घेत असून, शिक्षकांची संख्या सात आहे़
दरम्यान, शाळेची इमारत काळ्या मातीच्या जमिनीत बांधली असून, सन २००५ साली आलेल्या महापुराचा फटका या शाळेच्या इमारतीला बसला आहे़ या इमारतीत महापुराचे पाणी पाच फुटांवर शिरले होते़ हे पाणी पाच ते सहा दिवस या इमारतीत राहिल्याने जमीन खचून इमारत ढळली आहे़ प्रथमदर्शनी शाळेची समोरील बाजू रंगरंगोटी केल्याने पाहणाऱ्यांना बाहेरून शाळा सुंदर दिसते़ मात्र, आतील बाजूस सरकलेले पिलर व भिंतींना गेलेले तडे हे स्पष्ट दिसत आहेत़ तर एकमेकाला अडकत असलेले पिलर सुटून अंतराळी राहिले आहेत़ त्यामुळे ही इमारत शाळेला धोकादायक बनली आहे़ आजही या शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतचे १५३ विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालूनच या धोकादायक इमारतीत ज्ञानार्जन करीत आहेत़ त्यामुळे पालक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शासन स्तरावर दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे़
येथील शाळेची इमारत केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे़ अनेक मुले या शाळेतून दर्जेदार शिक्षण घेतात़ मात्र, जिल्हा परिषदेत गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करूनही याची दखल घेतली जात नाही़ तरी लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा, न झाल्यास सर्वपक्षीय आंदोलन करू़
- दीपाली बोरगांवे, सरपंच, ग्रामपंचायत आलास.
या शाळेची इमारत धोकादायक बनल्यामुळे दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे़ मात्र, हा निधी अद्याप मंजूर झाला नाही़ तरी या इमारतीसाठी १५ ते २० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने मी या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करणार आहे़
- सुनंदा दानोळी,
जिल्हा परिषद सदस्य, आलास.