स्थगित मंजूर निधी आणून दाखवाच
By Admin | Updated: February 9, 2015 00:37 IST2015-02-09T00:02:29+5:302015-02-09T00:37:45+5:30
सतेज पाटील : अमल महाडिकांना आव्हान; कळंब्यात आठवडी बाजाराच्या इमारत संकुलाचे उद्घाटन

स्थगित मंजूर निधी आणून दाखवाच
कळंबा : भाजप सरकारने आघाडी सरकारच्या विकासकामांचे निर्णय रद्द करण्याचा धडाकाच लावला आहे. दक्षिण मतदारसंघासाठी तीन कोटी १९ लाखांचा विकासनिधी आणला. त्यापैकी कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी २५:१५ शीर्षकाखाली ५० लाखांचा निधी मंजूर केला. राज्य सरकारने त्यावर स्थगिती आणली. या स्थगिती दिलेल्या मंजूर विकासकामांच्या निधीचे पैसे रद्द न करता देण्याचे धाडस दाखविण्याचे जाहीर आव्हान सतेज पाटील यांनी दक्षिणच्या विद्यमान आमदारांना दिले.आघाडी सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. पेट्रोल दर कमी करून मूलभूत समस्या न सोडविता हे स्वप्न दिवास्वप्न राहणार आहे. २५ लाख रुपये खर्चून कळंबा ग्रा.पं.तर्फे उभारण्यात येणाऱ्या आठवडी बाजार संकुल इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच विश्वास गुरव होते. या बाजार संकुलाने २०० लोकांना रोजगार मिळणार आहे.
प्रास्ताविक उदय जाधव यांनी, तर आभारप्रदर्शन जि.प.चे सदस्य एकनाथ पाटील यांनी केले. यावेळी उपसरपंच दत्तात्रय हळदे, अजय सावेकर, नगरसेवक शारंगधर देशमुख, उदय जाधव, आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आक्रमकतेने सतेज पाटील बोलत होते. येत्या पाच महिन्यांनंतर मौन सोडून पुन्हा ‘तेज’ होण्याचे संकेत त्यांनी दिले.
सतेज पाटील यांनी विद्यमान आमदारांचे नाव न घेता आव्हान करीत हल्लाबोल केल्याने पालिका, गोकुळ, जिल्हा बँक, दक्षिणचे राजकारण ढवळणार हे नक्की.