कळंबा तलाव सुशोभीकरणात 'युनिटी'चा उजेड

By Admin | Updated: January 24, 2015 00:07 IST2015-01-24T00:04:07+5:302015-01-24T00:07:59+5:30

दहा कोटींचा निधी पडून : दीड वर्षांत फक्त निविदा प्रक्रियाच; महापालिकेचेही दुर्लक्ष

The brightness of 'Unity' in the beautification of the Kalamba lake | कळंबा तलाव सुशोभीकरणात 'युनिटी'चा उजेड

कळंबा तलाव सुशोभीकरणात 'युनिटी'चा उजेड

संतोष पाटील- कोल्हापूर -कळंबा तलाव व परिसर संवर्धनासाठी दहा कोटी रुपयांचा निधी येऊन तब्बल दीड वर्ष उलटले. काळम्मावाडी थेट पाईपलाईनची सल्लागार कंपनी ‘युनिटी कन्सल्टंट’ने डीपीआर (डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार केला. मात्र, निविदा प्रक्रियेतच सुशोभीकरण अडकले आहे. पाईपलाईनचे काम कासवगतीने होण्यामागे ‘युनिटी’ अकार्यक्षम असल्याचा आरोप महासभेत नगरसेवकांनी केला. कळंबा तलाव सुशोभीकरणाचे कामही त्यांच्यामुळेच रखडल्याने नगरसेवकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कळंबा तलाव परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाने दीड वर्षापूर्वी दहा कोटींच्या निधीची घोषणा केली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्याचे थाटात उद्घाटनही झाले. प्रत्यक्ष काम मात्र अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, महापालिका प्रशासनाने साडेसात कोटी रुपयांच्या सुशोभीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया राबविली. कामास लवकरच सुरुवात होणार असल्याने पुढील सहा महिन्यांत कळंबा परिसर उजळणार असल्याचे चित्र उभे केले. मात्र, प्रशासकीय स्तरावर वर्षभर हालचालच झाली नाही.
तलावाच्या सुशोभीकरणाचा आराखडा ‘युनिटी’च्या सल्ल्याने पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. नागरिकांना तेथे स्वच्छ हवा मिळावी, मनाला शांतता लाभावी, सुंदर अशा बगीच्यामुळे विरंगुळा मिळावा, असा हेतू या सुशोभीकरणामागे आहे. तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी तारेचे कुंपण, तलावातील पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने ते स्वच्छ ठेवण्यासाठी प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. मात्र, हा आराखडा अद्याप कागदावरच आहे.
तब्बल तीन वेळा निविदा काढून ठेकेदारांचा प्रतिसाद नाही, याचे उत्तर शोधून निविदेत योग्य तो बदल करण्याची जबाबदारी सल्लागार कंपनीची; मात्र, ‘युनिटी’ला काहींचे पाठबळ आहे. ‘युनिटी’च्या चुकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा आरोप नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
कळंबा तलाव सुशोभीकरण रखडल्याने नागरिक, पर्यावरण व पक्षीप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे. थेट पाईपलाईननंतर आता पुन्हा ‘युनिटी’च्या कारभारावर वादंग उठण्याची शक्यता आहे.

Web Title: The brightness of 'Unity' in the beautification of the Kalamba lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.