तरुणाच्या खूनप्रकरणी दोघे अटकेत
By Admin | Updated: February 23, 2015 23:55 IST2015-02-23T23:53:40+5:302015-02-23T23:55:38+5:30
मिरजेतील घटना : खुनाची कबुली; अनैतिक संबंधाच्या रागातून कृत्य

तरुणाच्या खूनप्रकरणी दोघे अटकेत
मिरज : मिरजेत अक्रम मुख्तार शेख (वय २६) या तरुणाचा गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी अमीर गौस पठाण (२४, रा. शंभरफुटी रस्ता, मिरज), मोअज्जम हुसेन शेख (२२, तानाजी चौक, मिरज) या दोघांना मिरज शहर पोलिसांनी अटक केली. अनैतिक संबंध व पैशाच्या देवघेवीच्या कारणातून अक्रम शेख याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिरजेत मंगळवार पेठेतील कॅरम क्लबमध्ये अक्रमचा रविवारी दुपारी गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून झाला होता. याबाबत पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी सांगितले की, आरोपींनी अनैतिक संबंधाच्या रागातून व मृत अक्रम याच्याशी असलेल्या ौमनस्यातून त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे.
आरोपी अमीर गौस पठाण याचा भाऊ सलीम पठाण याचा पायल या तरुणीसोबत प्रेमविवाह झाला होता. मृत अक्रम व आरोपी अमीर यांची मैत्री असल्याने अक्रमचे घरी येणे-जाणे होते. यातून अक्रम व पायल यांचे सूत जुळले. या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय अमीर व त्याचा भाऊ सलीम यास आल्यानंतर सलीमने पायलसोबत घटस्फोट घेतला. यातून अक्रम व अमीर यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते.
मंगळवार पेठेत अमीरच्या मोबाईल शॉपीसमोरून मृत अक्रम हा पायल हिच्यासोबत मोटारसायकलवरून फिरत असल्याने अमीरच्या मनात राग होता. आरोपी अमीर याचा दुसरा साथीदार मोअज्जम शेख याला कॅरम क्लबमध्ये अक्रमने पट्ट्याने मारहाण केली होती. सहा महिन्यांपूर्वी अक्रमने २५ हजार रुपये व्याजाने अमीरला देताना २१ हजार देऊन व ४ हजार रुपये व्याज कापून घेतले. यामुळे अक्रम व अमीर यांच्यात वाद झाला होता. अक्रम याने अमीर व त्याचा भाऊ सलीम यांचा गेम करणार आहे, असे काही मित्रांसमोर बोलून दाखविले होते. अक्रम आपल्याला जिवंत ठेवणार नाही, या भीतीने अमीरने त्यालाच संपविण्याचा कट रचला. यामध्ये अमीरचा साथीदार मोअज्जम शेख हा सामील झाला.
अक्रम व मोहसीन बेग कॅरम क्लबमध्ये बसले असताना अमीर पठाण याने त्याच्याजवळ असलेल्या गावठी पिस्तुलातून झाडलेली एक गोळी अक्रमच्या बरगडीत लागल्याने अक्रम खाली कोसळला. त्यानंतर मोअज्जमने कोयत्याने तोंडावर, डोक्यावर, पोटावर सपासप वार केले. खुनाच्या घटनेनंतर पलायन केलेल्या अमीर व मोअज्जम यांना आष्टा येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलीस अधीक्षक सावंत यांनी सांगितले. खून करून दानोळी येथे वारणा नदीत टाकलेली कुकरी, कोयता व गावठी पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले. अमीर व मोअज्जम यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे काय, याची खात्री करण्यात येत आहे.
मध्यस्थीनेच आरोपी हजर ?
खुनातील आरोपी काहींच्या मध्यस्थीने सोमवारी पोलीस ठाण्यात हजर झाल्याची चर्चा सुरू होती; मात्र पोलिसांनी आरोपींना शोधून ताब्यात घेतल्याचा दावा केला. मिरजेत दोन गटांत वारंवार हाणामाऱ्यांचे प्रकार सुरू आहेत, अशा घटनानंतर स्थानिक नगरसेवक पोलिसांच्या कामात अडथळा आणून प्रकरण पोलीस ठाण्याबाहेर मिटविण्याचे प्रयत्न करतात. यामुळे मारामारी करणाऱ्या तरुणांच्या मनोधैर्यात वाढ होऊन गंभीर प्रकार घडत आहेत. यापुढे मारामारीच्या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला.