दोन्हीकडे उमेदवार हीच पवार यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:15 IST2018-10-06T00:14:59+5:302018-10-06T00:15:05+5:30

Both the candidates are Pawar's headache | दोन्हीकडे उमेदवार हीच पवार यांची डोकेदुखी

दोन्हीकडे उमेदवार हीच पवार यांची डोकेदुखी

विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या कोल्हापूर आणि सातारा या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्यादृष्टीने हुकमी विजयाच्या आहेत; परंतु तिथे विद्यमान खासदार अनुक्रमे धनंजय महाडिक व उदयनराजे भोसले यांना पक्षांतूनच विरोध सुरू झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यादृष्टीने ती एक नवी डोकेदुखी झाली आहे; पण पवार या दोन्ही उमेदवारांना बदलण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. सेफ गेमचे राजकारण ते करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
कोल्हापुरात गेल्या निवडणुकीत पवार यांनी धनंजय महाडिक यांना संधी दिली. देशात काँग्रेसविरोधी लाट असतानाही दोन्ही काँग्रेसची एकत्रित मूठ, महाडिक गटाची ताकद यामुळे ते विजयी झाले; परंतु लोकसभेला ज्यांचा पाठिंबा घेतला त्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याच विरोधात त्यांनी विधानसभेला रणशिंग फुंकले व त्यात पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे आमदार पाटील हे या लोकसभेला खासदार महाडिक यांच्या पराभवासाठी ताकद पणाला लावणार हे स्पष्टच आहे; याचबरोबर महाडिक यांना स्वपक्षांतूनही विरोध आहे. आज पक्ष एका बाजूला व महाडिक दुसऱ्या बाजूला असे चित्र आहे. पक्षाचे मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यातही राजकीय संघर्ष सुरू आहे. म्हणूनच तर खा. महाडिक अध्यक्ष असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत चक्क मुश्रीफ यांच्या निषेधाचा ठराव झाला व त्याची प्रतिक्रिया म्हणून मुरगूडला महाडिक यांचा निषेध झाला. पक्षांतूनच असा विरोध असूनही पवार या वेळेला कोल्हापूरचा उमेदवार बदलतील का? याचे उत्तर नाही असेच आहे; कारण बदलूनही उमेदवारी द्यायची कुणाला? हा प्रश्न आहेच; शिवाय महाडिक यांनी खासदार म्हणून चांगली छाप पाडली आहे; त्यामुळे मुश्रीफ यांचीच समजूत काढून महाडिक यांनाच बळ द्यायचे धोरण पवार यांचे दिसते.
उदयनराजेंच्या उमेदवारीस टोकाचा विरोध
सातारा लोकसभा मतदारसंघातही खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीस पक्षांतूनच टोकाचा विरोध आहे. तिथेही पक्ष एका बाजूला व खासदार दुसºया बाजूला, अशी विभागणी झाली आहे. सहापैकी चार ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत व त्यांचा विद्यमान खासदारांना विरोध आहे. उदयनराजेंचे हुकूमशाहीसारखे वागणे पक्षाच्या नेत्यांना मान्य नाही. गेल्या निवडणुकीतही एकास एक लढत व सक्षम उमेदवार नसल्याने ते निवडून आले. या निवडणुकीत पवार यांच्यापुढे त्यांच्याऐवजी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रामराजे निंबाळकर असे उमेदवारांचे पर्याय आहेत. पक्षाची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड आहे; परंतु पवार उमेदवार बदलण्याच्या मन:स्थितीत नाहीत, कारण उदयनराजे भाजपकडे गेल्यास ही हक्काची जागा त्रासदायक ठरू शकेल, अशी भीती त्यांना वाटते.

Web Title: Both the candidates are Pawar's headache