फलकावर फोटो महिलेचा अन् ससेमिरा खंडणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:27+5:302021-01-21T04:23:27+5:30
कोल्हापूर : इमिटेशन ज्वेलरी दुकानाच्या फलकावर सुंदर महिलेचा फोटो वापरला, म्हणून संबंधित महिलेच्या तीन समर्थकांनी पाच लाख रुपये खंडणीची ...

फलकावर फोटो महिलेचा अन् ससेमिरा खंडणीचा
कोल्हापूर : इमिटेशन ज्वेलरी दुकानाच्या फलकावर सुंदर महिलेचा फोटो वापरला, म्हणून संबंधित महिलेच्या तीन समर्थकांनी पाच लाख रुपये खंडणीची मागणी केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार गुजरी परिसरात घडल्याने सराफ व्यावसायिकांत बुधवारी खळबळ माजली.
गुजरी परिसरातील एका इमिटेशन ज्वेलरी दुकानाच्या नामफलकावर मालकाने अज्ञात, सुंदर महिलेचा फोटो वापरला. संबंधित महिला कोण आहे, हे दुकानदारालाही अगर फलक तयार करणाऱ्याला माहीतही नाही. सुंदर महिलेचा फोटो मिळाला म्हणून संबंधित फलक तयार करणाऱ्याने तो वापरला. फोटो पाहून संबंधित महिलेचे तीन अनोळखी समर्थक चार दिवसांपूर्वी ज्वेलरीच्या दुकानात आले. त्यांनी दुकानमालकाला संबंधित फोटोबाबत जाब विचारला. फलकावर फोटो वापरल्याबद्दल पाच लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असेही त्यांनी बजावले. दुकानदाराने त्यास नकार दिला; पण त्यानंतर त्या तीन युवकांनी वारंवार येऊन त्यांनी दुकानमालकास पाच लाख रुपये द्या; अन्यथा दुकानाची तोडफोड करण्याची धमकी दिली. खंडणीच्या नव्या प्रकारामुळे गुजरी परिसरात खळबळ माजली.
वारंवार धमक्या सुरू राहिल्याने दुकानमालकाने अखेर बुधवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांची भेट घेऊन घडल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात तिघां युवकांसह संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस त्या महिलेचा तसेच तिघा संशयितांचा शोध घेत आहेत.