मर्यादित आवाजाचे फटाके उडवा
By Admin | Updated: October 30, 2015 23:10 IST2015-10-30T00:04:54+5:302015-10-30T23:10:43+5:30
प्रदूषण मंडळ, पर्यावरणप्रेमींचे आवाहन : फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेची चाचणी

मर्यादित आवाजाचे फटाके उडवा
कोल्हापूर : आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. तसेच असे फटाके जर कोणी विकत असेल व ते उडवीत असेल, तर त्या दोघांवर कायदेशीर कडक कारवाई होऊ शकते. ध्वनिप्रदूषणाने होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी मोठ्या आवाजाचे फटाके वाजवू नयेत, असे आवाहन गुरुवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरणप्रेमींच्या वतीने करण्यात आले. सायबर कॉलेजमधील पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्यावतीने फटक्यांच्या तीव्रतेची चाचणी घेण्यात आली.
सायबर महाविद्यालय येथील बास्केटबॉल मैदानावर गुरुवारी ही चाचणी घेण्यात आली. यावेळी सुतळी बॉम्ब, एक व दोन हजार फटाक्यांच्या माळांची तसेच लहान आवाजाच्या फटाक्यांच्या तीव्रतेची चाचणी घेण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने केला जात आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही फटाकेउत्पादकांना जादा आवाजाचे फटाके तयार करू नका, असे आवाहन केले आहे. तरीही तीव्र आवाजाच्या फटाक्यांची विक्री केल्यास कारवाई नक्कीच करण्यात येईल. आज घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये सुट्या फटक्यांमध्ये मर्यादा ओलांडणारा एक फटाका आढळून आला आहे.
याप्रसंगी प्रादेशिक अधिकारी एन. एच. शिवांगी, उपप्रादेशिक अधिकारी जया कदम, सहायक कामगार आयुक्त सुहास कदम, पोलीस निरीक्षक एम. डी. सकाळे, पर्यावरणप्रेमी अनिल चौगुले,
उदय गायकवाड यांच्यासह
‘सायबर’चे पर्यावरण विभागाचे डॉ. ए. आर. कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
फटाके न वाजविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहल
दिवाळीत फटाके न उडविणाऱ्या मुलांसाठी निसर्गमित्र यांच्यावतीने २१ व २२ नोव्हेंबर रोजी गगनबावडा येथे सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या दिवाळीत फटाके न वाजविता या सहलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगले यांनी केले.