‘व्हॅलेंटाइन्स डे’ निमित्त जोडली ‘रक्ता’ची नाती
By Admin | Updated: February 13, 2015 23:23 IST2015-02-13T23:15:11+5:302015-02-13T23:23:54+5:30
कोल्हापूर युवा आॅर्गनायझेशनचा उपक्रम

‘व्हॅलेंटाइन्स डे’ निमित्त जोडली ‘रक्ता’ची नाती
संतोष मिठारी - कोल्हापूर -समाजाला रक्ताच्या नात्याची व्हॅलेंटाइन्स डे भेट दरवर्षी कोल्हापुरातील युवा आॅर्गनायझेशन ग्रुप देत आहे. ‘आवडत्या व्यक्तींवर प्रेम कराच, पण रक्ताची नाती जोडा,’ असा संदेश देत गेल्या सहा वर्षांपासून या ग्रुपचा उपक्रम सुरू आहे.
२००७ मध्ये राजारामपुरीच्या पहिल्या गल्लीत सोनल शिर्के, सतीश गवस, रोहित देसाई, कौस्तुभ देसाई, राहुल घोटणे व सागर चव्हाण या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘युवा आॅर्गनायझेशन’ची स्थापना केली. सहा वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त रक्तदान शिबिराची सुरुवात केली. या ग्रुपने आतापर्यंत १ हजार ९०० रक्तपिशव्यांचे संकलन केले आहे. रक्तगटानुसार दात्यांची यादी बनविली असून, त्याद्वारे गरजू रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो. तरुण स्वत:हून उपक्रमात सहभागी होतात. सध्या ग्रुपमध्ये ३० जण कार्यरत आहेत.
गरजू रुग्णांसाठी...
संकलित रक्ताचा अनेक रुग्णांना लाभ झाला आहे. गरजू रुग्णांसाठी ते विनामोबदला दिले जाते. संकलित रक्त एकाच ब्लड बँकेला न देता दरवर्षी वेगवेगळ्या संस्थेला दिले जाते.
- सोनल शिर्के, अध्यक्ष, युवा आॅर्गनायझेशन