काळ्याकुट्ट पाण्याचा ओढा थेट मिसळतो पंचगंगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:07+5:302021-01-23T04:24:07+5:30
लढा पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा - ०३ विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इचलकरंजी शहरातून पंचगंगा नदीला अत्यंत काळेकुट्ट ...

काळ्याकुट्ट पाण्याचा ओढा थेट मिसळतो पंचगंगेत
लढा पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा - ०३
विश्वास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : इचलकरंजी शहरातून पंचगंगा नदीला अत्यंत काळेकुट्ट व दुर्गंधीयुक्त पाणी घेऊन वाहणारा ‘काळा ओढा’ आजही पंचगंगा नदीत दिवसरात्र मिसळत आहे. जे पाणी पाहूनच अंगावर शहारे येतात, असे पाणी नदीत मिसळताना पाहून नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत इचलकरंजी नगरपालिकेसह विविध यंत्रणा किती बेफिकीर आहेत, याचेच प्रत्यंतर आले.
मुख्यमंत्री आदेश देवोत की पंतप्रधान; प्रदूषण नियंत्रण मंडळासह कुणालाच त्याचे काही वाटत नाही, इतकी गेंड्याच्या कातडीची ही यंत्रणा बनली आहे. तक्रारी झाल्या, आंदोलने झाली की अधिकाऱ्यांचे हप्ते वाढतात. प्रदूषण काही थांबत नाही, असाच आजपर्यंतचा अनुभव आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी या प्रदूषणप्रश्नी मंत्रालयात बैठक घेतल्यावर यंत्रणा जरूर हलली. त्यांनी ओढ्यात मातीची पोती भरून तात्पुरते दोन-तीन बंधारे उभारले. त्यातून पाणी अडविले, परंतु ते रोखलेले नाही. पाण्याचा लोट आजही नदीत मिसळत आहे. हा ओढा सुरू कुठे होतो व तो पंचगंगा नदीत नक्की कुठे मिसळतो, हे ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी गुरुवारी (दि. २१) दुपारी शेतवडीतून जाऊन पाहिले. खरा तर हा ओढा नाहीच; तो काळ्या नदीसारखाच आहे. पंचगंगा दुतर्फा भरून वाहत आहे आणि तो टाकवडे वेशीपासून पूर्वेला वाहत जाऊन नदीत मिसळत आहे. तो जिथे मिसळतो तिथे प्लास्टिकचा कचऱ्याचा ढीग साचला होता. नदीचे निम्मे पात्र अक्षरश: गटारीसारखे काळे झाले आहे. पाण्यातून घाण उमाळे येत होते. हे सारे संतापजनकच आहे. हेच पाणी पोटात घेऊन पंचगंगा बिचारी उत्तरेकडे वाहत जाते. प्रदूषणामुळे मासे मरतात, माणसे मरतात, त्याचे पंचनामे होतात; परंतु प्रदूषण रोखण्याच्या दीर्घकालीन उपाययोजना यशस्वी झालेल्या नाहीत, हे कटू सत्य आहे.
...........
प्रतीकांचीच पूजा..
नदीला आपण आई मानतो. ती ओलांडतानाही आवर्जून हात जोडले जातात; परंतु तिचे प्रदूषण रोखण्याबद्दल मात्र कमालीचे बेफिकीर असल्याचे चित्र सार्वत्रिक दिसते. मागील पाच वर्षांत शिवसेनेचे तत्कालीन आमदार उल्हास पाटील यांनी ‘संगम ते उगम’ अशी परिक्रमा घडवून आणली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी ‘नमामि पंचगंगा’ उपक्रम हाती घेतला. खासदार धैर्यशील माने यांनीही असेच काही उपक्रम हाती घेतले; परंतु या सर्वांचेच पुढे काय झाले हे कुणालाच समजले नाही. त्यातून प्रदूषण काही रोखले नाही. ते रोखण्यापेक्षा असल्या प्रतीकात्मक कार्यक्रमांतच लोकप्रतिनिधींना जास्त रस असल्याचे चित्र दिसते.
..............
रामदासभाईंची गर्जना..
भाजप-शिवसेनेचे सरकार असताना पर्यावरणमंत्री असलेल्या रामदास कदम यांनी पंचगंगा प्रदूषणप्रश्नी कोल्हापुरात शासकीय विश्रामधामवर बैठक घेतली. प्रदूषण रोखले नाही तर कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त व इचलकरंजीच्या मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले; परंतु त्यानंतर प्रदूषण करण्यात ज्यांचा वाटा आहे, अशा मंडळींचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटून आले. त्यानंतर ते हे गुन्हे दाखल करण्याचेच विसरून गेले.
..........
आदेशाचा फायदा असाही..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतली आणि प्रदूषणास कारणीभूत असलेल्या उद्योगांना टाळे ठोका, असे आदेश दिले. असे आदेश आले की प्रदूषण रोखणारी यंत्रणा अधिक सतर्क होते. प्रदूषण रोखल्याचे कागदोपत्री घोडे नाचविले जातात, आराखडे तयार होतात; परंतु प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी फारच कमी होते व आदेशाची भीती दाखवून पाकिटाचे वजन मात्र वाढते, असाच आजपर्यंतचा अनुभव आहे.
............
अक्षम्य दुर्लक्ष
मागील सरकारच्या काळात पंचगंगा प्रदूषणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबरदस्त राजकीय ताकद होती. त्यांनी मनात आणले असते तर नवीन नदी ते तयार करू शकले असते; परंतु पंचगंगेच्या प्रदूषणप्रश्नी त्यांनी साधी बैठकही कधी घेतली नसल्याचे वास्तव आहे.
...........
२१०१२०२१-कोल-पंचगंगा प्रदूषण ०१ व ०२
पंचगंगा नदीच्या प्रदूषणास सर्वांत जास्त जबाबदार असणारा इचलकरंजीतील हाच तो काळा ओढा. तो टाकवडे वेसपासून दक्षिणेला सुमारे दोन किलोमीटरवर पंचगंगा नदीत मिसळतो व नदीचे गटार करतो. गुरुवारी दुपारी त्याच्यातून काळ्याकुट्ट पाण्याचा लोट नदीत मिसळत होता. (छाया : उत्तम पाटील)
२१०१२०२१-कोल-पंचगंगा प्रदूषण ०३
पंचगंगा नदीच्या उत्तरेकडून वाहत येणारा हाच तो काळा ओढा. जिथे तो नदीत मिसळतो तिथे कचऱ्याचा असा ढीग पाण्यावर तरंगत असून, पाण्यावर तवंगही आला आहे.
(छाया : उत्तम पाटील)