‘के.पी.’ना दाखविले काळे झेंडे
By Admin | Updated: August 25, 2014 23:49 IST2014-08-25T23:48:03+5:302014-08-25T23:49:22+5:30
विकासकामांबाबत केलेल्या निव्वळ घोषणांचा जाब विचारत येथील सुमारे शंभरावर तरुणांनी निषेध केला

‘के.पी.’ना दाखविले काळे झेंडे
राशिवडे : राधानगरी-भुदरगडचे आमदार के. पी. पाटील यांना विकासकामांबाबत केलेल्या निव्वळ घोषणांचा जाब विचारत येथील सुमारे शंभरावर तरुणांनी काळे झेंडे दाखवून जोरदार निषेध केला. व घोषणाबाजी केली. आमदार पाटील यांनी राशिवडेस दोन कोटींचा विकास निधी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित केला होता. कार्यक्रमास जाताना काळे झेंडे दाखविल्याने गोंधळ उडाला. सोशल मीडियावरून ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली.
शिव-शाहू संघटनेच्यावतीने राष्ट्रवादीचे आमदार के. पी. पाटील यांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमास मोटारसायकल रॅलीने जात असताना तरुणांनी नामानंद चौकात आमदार पाटील यांची गाडी अडवली. यावेळी काळे झेंडे दाखवून व घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आमदार के. पी. पाटील व ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी निदर्शकांसमोर जाऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी निवेदन देणार आहात काय? असा प्रश्न तरुणांना विचारला असता विकास कोणाचा केला? असा प्रतिप्रश्न तरुणांनी आमदारांना केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. किसन चौगले, धैर्यशील पाटील यांनी युवकांना शांत करीत आमदारांना गाडीत बसवून मार्गस्थ केले.
दरम्यान, सत्कार समारंभात आ. के. पी. पाटील म्हणाले, काळे झेंडे दाखविल्यामुळे मी अजूनही कामे करण्यास कमी पडत असल्याचे जाणवले. यामुळे नव्याने काम करण्यास प्रेरणा मिळाली आहे. यावेळी ‘भोगावती’चे संचालक अविनाश पाटील यांनी झाल्या प्रकाराचा निषेध केला.