भाजपचा बालेकिल्ला भेदण्यासाठी चक्रव्यूह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:21 IST2021-01-22T04:21:16+5:302021-01-22T04:21:16+5:30
तपोवनमध्ये अस्तित्वाची लढाई : तुल्यबळ उमेदवारीसाठी चाचपणी अमर पाटील : कळंबा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील ...

भाजपचा बालेकिल्ला भेदण्यासाठी चक्रव्यूह
तपोवनमध्ये अस्तित्वाची लढाई : तुल्यबळ उमेदवारीसाठी चाचपणी
अमर पाटील : कळंबा
: भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निवासस्थान असणारा व गेली १० वर्षे भाजपच्या बालेकिल्ला ठरलेल्या प्रभाग ६९, तपोवनला खिंडार पाडण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी चालविली आहे. त्यासाठी सक्षम उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीत तपोवनमध्ये हायव्होल्टेज लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने या प्रभागातून पालिकेत जाण्यासाठी इच्छुक महिला उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. १५ लहान-मोठ्या कॉलन्यांचा समावेश असणाऱ्या या प्रभागात संभाजीनगर झोपडपट्टीमधील पंधराशे मतदारांचे मतदान निर्णायक ठरते. गेल्या दोन निवडणुकीत भाजप उमेदवारास या मतदारांनी कौल दिला होता. आता संभाजीनगर झोपडपट्टीतून तीन महिला इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, येथून एकच उमेदवार देण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. असे झाल्यास त्याचा सर्वात मोठा फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. २०१० मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे सुभाष रामुगडे यांनी काँग्रेसच्या दत्ता बामणे यांचा निसटता पराभव केला होता. तर २०१५ च्या निवडणुकीत हा प्रभाग इतर मागासवर्गीयासाठी आरक्षित होता. यावेळी भाजपचे विजयसिंह खाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमोद पोवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. शिवसेनेचे सुरेश चौगुले, काँग्रेसचे उमर फारुख शेख यांना मात्र अपेक्षित मते घेता आली नव्हती. या प्रभागात गटातटाच्या राजकारणापेक्षा पक्षीय राजकारण मोठ्या प्रमाणावर चालते. आजमितीला शुभांगी प्रमोद पोवार, माजी नगरसेवक विजयसिंह खाडे यांच्या पत्नी अमृता खाडे, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांच्या पत्नी शीतल रामुगडे, कल्पना पाटील, स्मिता देसाई, गीता देसाई, सविता पाटील, शरयू पत्की, शुभांगी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यासाठी त्यांनी आपापल्या नेत्यांकडे उमेदवारी मिळवण्यासाठी मनधरणी सुरू केली आहे. दरम्यान, इच्छुकांची संख्या जास्त असल्याने यया प्रभागातील लढत बहुरंगी होण्याची शक्यता आहे.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते : विजयसिंह खाडे, भाजप २१३६, प्रमोद पोवार राष्ट्रवादी काँग्रेस १२७७, उमर फारुख शेख काँग्रेस ६८ , सुरेश चौगुले शिवसेना १८५.
प्रभागातील समस्या: १) नालेसफाईअभावी नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते २) कळंबाजेल ते कळंबा फिल्टर हाऊस १६ इंची जलवाहिनीस गळत्या ३) कमी दाबाचा व अपुरा पाणी पुरवठा ४) भाजीमंडई व आरोग्य केंद्राचा अभाव ५) संभाजीनगर झोपडपट्टीचा रखडलेला विकास आराखडा ६) अतिक्रमणात हरवलेला संभाजीनगर ते देवकर पाणंद चौक मुख्य रस्ता ७) संभाजीनगर झोपडपट्टीतील नागरी वस्तीच्या प्रमाणात तोकडी शौचालये
८) संभाजीनगर परिसरात वाढती गुन्हेगारी
सोडवलेले प्रश्न :१) ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांश मार्गी २) अंतर्गत रस्ते व पथदिवे विकसित ३) महा ई सेवा केंद्राची उभारणी करून मोफत नागरी सुविधा ४) प्रभागात महिला जिमची उभारणी
५) प्रभागात संपर्क कार्यालय उभारून नागरी समस्या निवारण
६) घरोघरी कचरा वर्गीकरणासाठी दोन प्लास्टिक बदल्या पुरवून कचरा संकलन ७) तेरापैकी १० खुल्या आरक्षित जागा ताब्यात घेऊन विकसित केल्या.
प्रभाग ६९, तपोवन.
विद्यमान नगरसेवक : विजयसिंह खाडे,
आताचे आरक्षण : सर्वसाधारण महिला
कोट : गेल्या पाच वर्षात चार कोटींची विकासकामे प्रभागात करण्यात आली असून, बहुतांश मूलभूत प्रश्न मार्गी लावले आहेत. संभाजीनगर झोपडपट्टीच्या विकास आराखड्याचा प्रश्न निव्वळ पालिका प्रशासनाच्या नाकार्तेपणामुळे प्रलंबित राहिला. पालिकेतील विकासनिधी वाटपातील दुजाभावामुळे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यात अडचणी निर्माण झाल्या . विजयसिंह खाडे नगरसेवक.
फोटो २१ प्रभाग क्रमांक ६९
ओळ :संभाजीनगर झोपडपट्टीतील दीड हजार नागरिकांसाठी रस्त्याच्या कडेस तोकडी शौचालये आहेत. परिणामी संभाजीनगर बसस्थानक परिसराचा उघड्यावर शौचास वापर होतो. दुसरीकडे रस्त्याच्या कडेस वाहतुकीला अडथळा करणारा कचरा.