परमबीर सिंगांना माफीचा साक्षीदार करण्याचा भाजपचा प्रयत्न : मुश्रीफ यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 18:18 IST2021-03-22T18:16:28+5:302021-03-22T18:18:23+5:30
Hasan Mushrif Kolhapur-राज्यात कोरोनाचे संकट असताना विरोधकांना राजकारण सुचत आहे, हे दुर्दैवी असून, ऐनकेणप्रकारेण राज्य सरकार अस्थिर करून भाजपला सत्तेत यायचे आहे. वाझे प्रकरणात परमबीर सिंगांना माफीचा साक्षीदार करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापुरात केला.

परमबीर सिंगांना माफीचा साक्षीदार करण्याचा भाजपचा प्रयत्न : मुश्रीफ यांचा आरोप
कोल्हापूर : राज्यात कोरोनाचे संकट असताना विरोधकांना राजकारण सुचत आहे, हे दुर्दैवी असून, ऐनकेणप्रकारेण राज्य सरकार अस्थिर करून भाजपला सत्तेत यायचे आहे. वाझे प्रकरणात परमबीर सिंगांना माफीचा साक्षीदार करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापुरात केला.
वाझे प्रकरणावरून विरोधकांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली किंवा सरकार अल्पमतात आले तर राष्ट्रपती राजवट येते. अशी काहीच परिस्थिती नसताना पोलीस अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे केंद्र सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही.
सुशांतसिंग राजपूत, गोस्वामी आदी प्रकरणात विरोधकांनी हवा देण्याचा प्रयत्न केला. केंद्रात सत्ता असली म्हणून कधीही राष्ट्रपती राजवट लावता येत नाही, मग ग्रोधा प्रकरणावेळी काँग्रेसने गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लावली असती.
काहीतरी कुरापत काढून सरकार अस्थिर करायचे प्रयत्न असून, आज प्रकाश आंबेडकरांनी मागणी केली, उद्या रामदास आठवलेही सरकार बरखास्तीची मागणी करतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक आदी उपस्थित होते.