कागल-मुरगूडमध्ये भाजप-शिवसेनेचं ‘जमलं’
By Admin | Updated: November 9, 2016 00:52 IST2016-11-09T00:27:24+5:302016-11-09T00:52:41+5:30
जागावाटप जाहीर : अखेर घाटगे-मंडलिकच एकत्र, संभ्रम दूर; मात्र दोन्ही पक्षांपुढे अर्ज मागे घेण्याचे दिव्य

कागल-मुरगूडमध्ये भाजप-शिवसेनेचं ‘जमलं’
कोल्हापूर : आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी कागल व मुरगूड नगरपालिकांमध्ये भाजप व शिवसेना या पक्षांतील युतीवर मंगळवारी येथे शिक्कामोर्तब झाले. भाजपतर्फे समरजित घाटगे व शिवसेनेतर्फे संजय मंडलिक यांनी अधिकृतपणे ही युती झाल्याचे जाहीर केले. गेल्या आठवड्यात तालुक्यात मंडलिक-हसन मुश्रीफ आघाडीची जोरदार हवा झाली होती. ती संभ्रमावस्था या घोषणेने दूर झाली. आता दोन्ही पक्षांपुढे आपापल्या कार्यकर्त्यांचे अर्ज माघारी घेणे हे दिव्य आहे.
मंडलिक यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी मंगळवारी दुपारी युतीला अंतिम स्वरूप देण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, प्रवीणसिंह घाटगे, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, जिल्हाध्यक्ष विजय देवणे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, वीरेंद्र मंडलिक, बाबगोंड पाटील, बाबासाहेब हिंदुराव पाटील, राजेखान जमादार, भूषण पाटील, नामदेवराव मेंडके, प्रकाश पाटील, अतुल जोशी, ईगल प्रभावळकर,आदी उपस्थित होते.
राज्यात भाजप-शिवसेनेची युती असल्याने त्याच धर्तीवर नगरपालिकेतही या दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
निर्णय अधांतरीच : त्या पाच जागांचा तिढा कायम
कागलमध्ये मंडलिक गटाच्या बाबगोंड पाटील व चंद्रकांत गवळी यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून आघाडी केली होती. त्यामध्ये शिवसेनेला कागलमध्ये पाच जागा दिल्या होत्या.
त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिल्याने तिथे नवाच पेच तयार झाला होता. तिथे आता पाचपैकी चार ठिकाणी राष्ट्रवादी काँगे्रसने अपक्ष उमेदवार उभे केले आहेत.
गंगाराम शेंबडे यांचा स्वत:चा व त्यांच्या पत्नीचा अर्ज रिंगणात आहे. शेंबडे हे गवळी यांच्याशी संबंधित आहेत. गवळी सध्या काही कामानिमित्त मुंबईला गेले आहेत.
स्वत: शेंबडे यांनी आपला माघारीचा अर्ज मंगळवारीच संजय मंडलिक यांच्याकडे आणून दिला आहे; परंतु त्यांच्या पत्नीच्या अर्जाबाबत नेमके काय होते, हे अजूनही अधांतरीच आहे. त्यांनी माघार घेतल्यास या प्रभागातून घाटगे गटाचा उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतो; पण ही गोष्ट ‘जर-तर’वर अवलंबून आहे.
कागल व मुरगूड नगरपालिकांमध्ये आमची भाजपशी आघाडी झाली आहे. तिची अधिकृत घोषणा केली आहे. माघारीच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलू. कागलमध्ये मंडलिक गटाच्या व मुरगूडमध्ये घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी आजच, बुधवारी आपापले अर्ज मागे घ्यावेत. यामुळे युतीला बळकटी येईल.
- संजय मंडलिक
शिवसेना सहसंपर्कप्रमुख
भावनेचा आदर करून युती
कागल तालुका ज्यांनी घडविला त्यांच्या वारसदारांचीच युती व्हावी, ही सामान्य जनतेची भावना होती. त्या भावनेचा आदर करून आम्ही दोन्ही नगरपालिकांमध्ये पक्षीय पातळीवर युती केली आहे. आता अर्ज माघारीची प्रक्रिया तातडीने होण्याची गरज आहे.
- समरजित घाटगे
भाजप नेते
असा ठरला फॉर्म्युला
पूर्वीच्या चर्चेनुसार मंडलिक गटाला कागलमध्ये तीन किंवा चार जागा सोडाव्यात व तेवढ्याच जागा मुरगूडमध्ये घाटगे गटाला सोडाव्यात, असा प्रस्ताव होता; परंतु कुणाला किती जागा सोडायच्या, यात एकमत होईना; म्हणून शेवटी कागलमध्ये सर्व जागा घाटगे गटाला व मुरगूडमध्ये सर्व जागा मंडलिक गटाला द्याव्यात, असा पर्याय पुढे आला. दोन्हीकडे नाममात्र प्रत्येकी एक जागा दोन्ही गट लढविणार आहेत.