पक्षपातीपणा न करता सर्वच डिजिटल फलक काढावेत, भाजप ओबीसी मोर्चाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:53+5:302021-01-08T05:22:53+5:30
कोल्हापूर : कोणताही पक्षपात न करता शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे डिजिटल फलक काढून टाकावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ...

पक्षपातीपणा न करता सर्वच डिजिटल फलक काढावेत, भाजप ओबीसी मोर्चाची मागणी
कोल्हापूर : कोणताही पक्षपात न करता शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे डिजिटल फलक काढून टाकावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी माेर्चातर्फे महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कोल्हापूर शहरात सर्वच राजकीय पक्षांचे अनधिकृत फलक लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून फलक हटविण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. मात्र ही कारवाई करत असताना पक्षपातीपणा केला जात आहे. केवळ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे फलक काढले जात असून, इतर कोणत्याही राजकीय पक्षांचे फलक काढले जात नाहीत. ही बाब लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा आणि सरसकट सर्वच फलक काढण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रशासक बलकवडे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष संदीप कुंभार, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष महेश यादव, विद्या बनसोडे, चिनार गाताडे, श्रद्धा मेस्त्री, स्वाती तेली, अभिजित पोवार, सचिन काकडे, दीपक पेटकर, श्रीशल्य स्वामी यांचा समावेश होता.