मंदिर, मशीद उघडण्यासाठी भाजप-एमआयएमचे हातात हात : हसन मुश्रीफ यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:03 IST2020-08-29T18:01:16+5:302020-08-29T18:03:00+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व एमआयएमचे खासदार इम्तिहाज जलील हे मंदिर व मशीद उघडण्यासाठी हातात हात घालून काम करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (दि. २८) पत्रकारांशी बोलताना केली.

मंदिर, मशीद उघडण्यासाठी भाजप-एमआयएमचे हातात हात : हसन मुश्रीफ यांची टीका
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व एमआयएमचे खासदार इम्तिहाज जलील हे मंदिर व मशीद उघडण्यासाठी हातात हात घालून काम करीत आहेत. मंदिरे व मशिदी निश्चितपणे खुल्या केली जातील; मात्र कोरोनामुळे गोरगरीब किंवा श्रीमंत लोकांचा रतीब लावल्यासारखा मृत्यू होत आहे, याचे गांभीर्य या मंडळींनी ठेवले पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (दि. २८) पत्रकारांशी बोलताना केली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनामुळे आपण आपले सगेसोयरे गमावत आहोत. माझ्या बहीण व भाचीचा पती गमावला आहे. आपणास त्यांचे सांत्वनही करायला जाता आले नाही. एकेका घरातील दोन-तीन व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. तरीही मशीद उघडा, देऊळ उघडा कशासाठी सुरू आहे? सर्वच धार्मिक स्थळे उघडली जातील. याबाबत अनेकांची अनेक मते आहेत. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. मात्र भाजप व एमआयएम मिळून जे काही काम करीत आहेत, ते लोकहिताचे नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घंटानाद करण्यापेक्षा कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा अलमट्टीची उंची वाढवणार आहेत, ते थांबवावे. त्याचबरोबर मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी येडीयुरप्पा यांच्याशी बोलावे. त्यांनी येडीयुरप्पा यांच्या बंगलोर येथील दारात जाऊन आंदोलन करावे, त्यांच्या नेतृत्वाखाली आपणही जाऊ, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मोदींनी श्रेय घ्यावे, मात्र लस द्यावी
ऑक्सफर्डची लस तयार आहे, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लसीची घोषणा करतील, असे वाटत होते. मात्र तीन लसी आल्याने ते थांबले. माझी त्यांना विनंती आहे, लसीचे श्रेय घ्या; मात्र लस द्या, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.