साखर उत्पादनापेक्षा विक्रीचे मोठे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:25+5:302021-03-24T04:22:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे -- उत्पादन खर्चाएवढा साखरेला हमीभाव मिळणे हाच साखर उद्योगाला आधार ठरू शकतो. सध्या अतिरिक्त उत्पादनामुळे ...

साखर उत्पादनापेक्षा विक्रीचे मोठे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे -- उत्पादन खर्चाएवढा साखरेला हमीभाव मिळणे हाच साखर उद्योगाला आधार ठरू शकतो. सध्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखर उत्पादनापेक्षा विक्रीचे मोठे आव्हान साखर उद्योगापुढे उभे आहे, यामुळे
साखर कारखान्यांचे गोडाउन शिल्लक साखरेने दोन वर्षे फुल्ल आहेत, यासाठी केंद्र शासनाने साखरेला ३६ रुपये प्रति किलो हमीभाव द्यावा, अशी मागणी अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी केली. मंगळवारी कुंभी कासारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगाम समाप्ती कार्यक्रमात नंतर अध्यक्ष चंद्रदीप नरके बोलत होते.
संचालक ॲड. बाजीराव शेलार व त्यांच्या पत्नी मंगल शेलार यांच्या हस्ते समाप्ती कार्यक्रम पार पडला. उपाध्यक्ष निवास वातकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चंद्रदीप नरके म्हणाले की, कुंभीने या हंगामात ५ लाख ५० हजार ६१५ मे. टन उसाचे गाळप करून १२.६९ टक्के सरासरी उतारासह सात लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. या हंगामात तोडणी व वाहतूक यंत्रणेमुळे गाळप हंगामासाठी मोठी कसरत करावी लागली. सहवीज प्रकल्पातून ४ कोटी ४९ लाख १६ हजार युनिट वीज उत्पादन झाले असून, २ कोटी ७० लाख २९ हजार युनिट वीज विक्री करण्यात आली आहे. यातून १८ कोटी २७ लाख रुपये उत्पादन मिळाले आहे.
केंद्र शासनाचे साखर उत्पादन कमी करून इथेनॉल निर्मिती राबवलेले धोरण योग्य आहे. इथेनॉलच्या खरेदी व दराची हमी केंद्र शासनाने घेतल्याने भविष्यात साखर उत्पादन कमी होईल; पण साखरेला ३६ रुपये हमीभाव हाच उद्योगाला आधार ठरू शकते. यावेळी सर्व संचालक कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील, संजय पाटील, चिफ केमिस्ट प्रकाश पाटील व कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(फोटो)
कुंभी कासारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगाम समाप्ती समारोह संचालक ॲड. बाजीराव शेलार व पत्नी मंगला शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष निवास वातकर व सर्व संचालक उपस्थित होते.