अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान

By Admin | Updated: November 11, 2014 00:01 IST2014-11-10T21:00:46+5:302014-11-11T00:01:38+5:30

पर्यटनाचा विकास कागदावरच : तालुक्यात काही भागात अतिरिक्त पाणी, तर पाण्यासाठी वणवणही--राधानगरी तालुका

A big challenge for rehabilitation of sanctuary victims | अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान

अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान

संजय पारकर - राधागनरी --भिन्न भौगोलिक रचनेमुळे सहा-सात भागात विभागलेल्या राधानगरी तालुक्यात प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ््या समस्या आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीच्या विपुलतेमुळे औद्योगिक विकासावर मर्यादा आहेत. पर्यटन विकासाच्या दृष्टीने काही सुधारणा व त्याचा प्रसार झाल्यास रोजगार व विकासाची संधी उपलब्ध होण्यास चांगला वाव आहे. मात्र, त्यासाठी जाणिवपूर्वक व सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
धरणामुळे मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने दूधगंगा व भोगावती ही दोन खोरी विकसित झाली आहेत. दळणवळणाची सोय व साखर कारखान्यांचा परिसर असल्याने काही प्रमाणात हा परिसर संपन्न आहे, तर ‘ना रस्ता, ना पाणी’ अशा विरोधाभासाचा दुर्गम परिसरही या तालुक्यात आहे. दूधगंगा नदी व तिच्या कालव्यांमुळे काठावरील पाण्याची समस्या संपुष्टात आली असली, तरी आता कालव्यांच्या गळतीमुळे अतिपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कालव्यांचे अस्तरीकरण नसल्याने बारमाही वाहणाऱ्या पाण्यामुळे जमिनी नापीक बनत आहेत.
काळम्मावाडी धरणामुळे वाकीघोळ परिसराला बेटाचे स्वरूप आले आहे. जंगल व पाण्याने वेढलेल्या या भागाला चांगला बारमाही रस्ता नाही. अभयारण्यामुळे कामतेवाडी येथील पाटबंधारे प्रकल्प रेंगाळल्याने शेतीला पाणी नाही. तुळशी धरणाच्या काठावरील दुर्गमानवाड आपटाळ परिसर पूर्णत: कोरडवाहू आहे. चौदा वर्षांपूर्वी कामाला प्रारंभ होऊनही धामणी प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पडसाळी कोनोळी, म्हासुर्ली, गवशी परिसराला उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागते. दूधगंगा व भोगावती खोऱ्यांना जोडणाऱ्या डोंगरावरील बारडवाडी, चक्रेश्वरवाडीसह वाड्या-वस्त्यांची अवस्थाही अशीच आहे. मोठ्या प्रमाणात चांगल्या जमिनी आहेत; पण पाण्याअभावी केवळ खरीप पिकावर अवलंबून असणाऱ्या या भागांना पाण्याची नितांत गरज आहे.
अतिसंवेदनशील अशी ओळख असणाऱ्या राधानगरी-दाजीपूर अभयारण्यात सुमारे तीस वाड्या-वस्त्या आहेत. येथील निर्बंधामुळे माणसाचे जगणे कठीण बनत आहे. यापैकी अनेक वाड्यांची पुनर्वसनाची मागणी प्रलंबित आहे. वीस वर्षांपासून कार्यवाही सुरू असूनही गतवर्षी स्वेच्छा पुनर्वसन स्वीकारलेल्या एजिवडे येथील एकशे बारापैकी केवळ तीस कुटुंबांनाच लाभ मिळाला. हा वेग पाहता आणखी काही पिढ्या प्रश्न संपणार नाही, असे चित्र आहे.
दुर्गमानवाड येथील विठ्ठलाई मंदिराला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. याचाविकास झाल्यास त्याचा परिसराला लाभ होणार आहे. अन्य ठिकाणी गावापुरत्याच असणाऱ्या देवस्थानांना याचा फायदा झाला, पण महाराष्ट्र कर्नाटकच्या भागातून मोठ्या संख्येने भाविक येतात, तरीही येथे कसलीही सुधारणा नाही.

तालुक्याचे महत्त्वाचे प्रश्न

दूधगंगा कालव्यांची गळती
धामणी प्रकल्प
मंजुरीच्या प्रतीक्षेतील कामतेवाडी, बनाचीवाडी येथील लघुपाटबंधारे प्रकल्प
अभयारण्यग्रस्तांचे पुनर्वसन
राधानगरीतील मुख्य प्रशासकीय कार्यालय इमारत
४राधानगरीतील क्रीडा संकुल
४गैबी-परिते व मुदाळतिट्टा दाजीपूर व शेळेवाडी-बिद्री या राज्यमार्गाचे मजबुतीकरण
४दाजीपूर येथील पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानाचे काम
४दुर्गमानवाड येथील मंदिर परिसर विकास व तेथून गगनबावड्यास जोडणारा रस्ता
४दाजीपूर, म्हासुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र
४काळम्मावाडी धरण परिसरातील सुधारणा, देखभाल याकडे होणारे दुर्लक्ष

Web Title: A big challenge for rehabilitation of sanctuary victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.