संभाजी ब्रिगेडच्या दणक्यानंतर बिडीचे नाव बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:51 IST2020-09-11T15:49:05+5:302020-09-11T15:51:02+5:30
संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाच्या दणक्यानंतर अखेर संभाजी बिडी कंपनीने आपल्या उत्पादनात संभाजी हे नाव वगळत असल्याचे जाहीर केले आहे.

संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या संभाजी बिडीचे नाव बदलण्यास कंपनीस भाग पाडल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष केला.
कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाच्या दणक्यानंतर अखेर संभाजी बिडी कंपनीने आपल्या उत्पादनात संभाजी हे नाव वगळत असल्याचे जाहीर केले आहे.
कोल्हापुरातून सुरू झालेल्या या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर साबळे वाघिरे आणि कंपनीच्या मुख्य संचालक मंडळाने हा निर्णय घेतला. याचा आनंदोत्सव संभाजी ब्रिगेडने कोल्हापुरात दुचाकी रॅली काढून, साखर वाटून साजरा केला.
कोल्हापुरात संभाजी नावाने बिडी बंडल विकले जात होते. आपल्या संपूर्ण आयुष्यात कधी काडीलाही हात न लावलेल्या संभाजी महाराजांचे नाव बिडीला देणे ब्रिगेडला नेहमीच खटकत असते. १५ दिवसांपूर्वी कोल्हापुरात असा बिडी भरून ट्रक आला होता. ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ट्रक अडवून हे नाव वापरल्याबद्दल जाब विचारला होता.
२० लाख रुपयांचा माल कंपनीकडे परतही पाठवून दिला. त्यानंतर ब्रिगेडने ही मोहीम राज्यभर सुरू करीत आंदोलने, निदर्शने केली. याच कंपनीने यापूर्वी बिडी बंडलवर संभाजी महाराजांचा फोटोही वापरला होता. विरोधानंतर तो हटवण्यात आला.
कंपनीने घोषणा केल्यानंतर कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा केला गेला. दसरा चौकातून मोटार रॅली निघून ती रुईकर कॉलनी येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन अभिवादन करून थांबली.
यावेळी महापुरुषाच्या नावांचा गैरवापर खपवून घेणार नाही, असाही इशारा दिला. आंदोलनात अभिजित भोसले, भगवान कोईगडे, विकी जाधव, नीलेश सुतार, उमेश जाधव, शहाबाद शेख, अनिरुद्ध पाटील, अमरसिंह पाटील, संजय भोसले, विक्रमसिंह घोरपडे, रणजित देवणे, मदन परीट, प्रवीण काटे यांनी सहभाग घेतला.