प्लास्टिक मुक्तीसाठी शहरातून सायकल रॅली, आयुक्तांनी केला प्रबोधनाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 16:59 IST2020-02-29T16:57:15+5:302020-02-29T16:59:09+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून प्लास्टिक मुक्तीसाठी सायकलवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे जाऊन ठिकठिकाणी कोपरा सभा घेऊन लोकांना मार्गदर्शन करण्यात आले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून प्लास्टिक मुक्तीसाठी सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. रॅलीत महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, अधिकारी सहभागी झाले.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून प्लास्टिक मुक्तीसाठी सायकलवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे जाऊन ठिकठिकाणी कोपरा सभा घेऊन लोकांना मार्गदर्शन करण्यात आले.
रॅलीचा प्रारंभ महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते राजारामपुरी जनता बझार चौक येथून झाला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, ईश्वर परमार उपस्थित होते. कोल्हापूर ते दिल्ली सायकलवरून प्रवास केलेले आकाश गोपनूरकर व अनिकेत कांबळे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रॅलीमध्ये सर्वांकडे ‘प्लास्टिक हटाव, देश बचाव’, ‘कापडी पिशवी, घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी’, ‘प्लास्टिकमध्ये नाही शान, मिटवून टाकू नामोनिशाण’, ‘प्लास्टिकचा वापर सोडा, पर्यावरणाशी नाते जोडा’, अशा घोषणा देऊन नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. शहरातून ३५ किलोमीटर फिरून छ. शिवाजी मार्केट येथे दुपारी सव्वाबारा वाजता रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीदरम्यान जनता बझार चौक, लक्ष्मीपुरी मार्के ट, कोळेकर तिकटी, निवृत्ती चौक, गंगावेश तालीम व शिवाजी मार्केट येथे कोपरा सभा घेऊन आयुक्त कलशेट्टी यांच्यासह मान्यवरांनी प्रबोधन केले. महापौर आजरेकर यांनी प्लास्टिकचा वापर बंद करून आपले शहर ३१ मार्चपर्यंत प्लास्टिकमुक्त होण्याकरिता आवाहन केले. निवृत्ती चौक येथे कोपरा सभेमध्ये माजी नगरसेवक रवीकिरण इंगवले यांनी प्लास्टिक मुक्त शहर करण्यासाठी शिवाजी पेठेचा सहभाग राहील, अशी ग्वाही दिली. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी सोबत घेऊन बाहेर पडावे, असे आवाहन पर्यावरणमित्र अनिल चौगुले यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार यांच्यासह नेत्रदीप सरनोबत, संजय सरनाईक, सुभाष देसाई, रणजित चिले, हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, समीर वाघ्रांबरे, आर. के. पाटील, जयवंत पवार आदी अधिकारी तसेच उदय गायकवाड, अमित देशपांडे, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर उपस्थित होते.