प्रक्रियायुक्त पाण्याचा शेतकऱ्यांना लाभ
By Admin | Updated: May 25, 2015 00:38 IST2015-05-24T22:15:20+5:302015-05-25T00:38:42+5:30
मोफत पुरवठा : टप्प्या-टप्प्याने सहाशे एकरांचे होणार नंदनवन; नदीचे प्रदूषण कमी

प्रक्रियायुक्त पाण्याचा शेतकऱ्यांना लाभ
इचलकरंजी : येथील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या शुद्ध पाण्याच्या वापरातून परिसरातील सुमारे तीनशे शेतकऱ्यांची शेती पिकणार आहे. ही सुविधा वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसिंग असोसिएशन व राणा प्रताप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा नदीत मिसळणार नाही. त्यामुळे प्रदूषणही काही अंशी कमी होईल. उलट मोफत मिळणाऱ्या पाण्यामुळे टप्प्या-टप्प्याने सहाशे एकर शेतीचे नंदनवन होण्याची शक्यता आहे.
इचलकरंजीतील वाढत्या वस्त्रोद्योगाबरोबर येथे उत्पादीत कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोसेसर्स कारखान्यांची संख्या वाढली. त्यामुळे शहरात १२ पॉवर प्रोसेसर्स, ८ स्ट्रेंटर, ५० ब्रॅँड प्रोसेसर्स व काही संस्था स्थापित झाल्या. त्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याने मोठे-नाले आणि पंचगंगा नदीचे पाणी दूषित होऊ नये. यासाठी वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसिंग असोसिएशनने इचलकरंजी टेक्स्टाईल क्लस्टर योजनेतून १२ दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा केला. त्यातून प्रक्रिया केल्यानंतर सुमारे दहा लक्ष लीटर शुद्ध पाणी बाहेर पडते. हे पाणी शेतीला सिंचनास देण्यास आमदार सुरेश हाळवणकर यांनी पुढाकार घेतला.
आता वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसिंग असोसिएशनने हे पाणी शेती सिंचनास देण्यास दीड किलोमीटर अंतराची पाईप टाकून साईट क्रमांक १०२ जवळ एका चेम्बरला दिले आहे. तेथून हे पाणी शेती सिंचनासाठी सायफन पद्धतीने दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दीडशे एकर शेतीस पाणी पुरविले जाईल आणि टप्प्याटप्प्याने सहाशे एकर जमिनीस हे पाणी वितरीत होईल, अशी माहिती सेवा संस्थेचे प्रमुख अरूण पाटील यांनी सांगितली. (प्रतिनिधी)
इचलकरंजी शहरातून दररोज ३५ ते ४० दशलक्ष लीटर सांडपाणी तयार होते. मात्र सध्या फक्त २० दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. याशिवाय काळा ओढा व चंदूर नाला या दोन ठिकाणी आणखीन दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करून ते प्रक्रिया केलेले पाणी सुद्धा शेतीसिंचनास देण्यात येईल आणि अशा पाण्याची रोज ३८ दशलक्ष लीटर उपलब्धी असेल, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.