जग हाच वर्ग मानून ‘ग्लोबल टिचर’ व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:31+5:302021-01-18T04:21:31+5:30
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार’ हा पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना ...

जग हाच वर्ग मानून ‘ग्लोबल टिचर’ व्हा
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार’ हा पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहू छत्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनातील या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी यांच्या नावाने मला मिळालेल्या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. भविष्यात शिक्षण क्षेत्रात काम करण्याची दिशा मिळाली असल्याचे डिसले यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त आज केलेला माझा सत्कार हा बापूजींच्या विचारांचा, गुरुदेव कार्यकर्त्यांच्या कार्याचा असल्याचे प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी सांगितले. पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या चौकटीतून बाहेर पडून आपण आधुनिक शिक्षणपद्धती स्वीकारली पाहिजे, असे शाहू छत्रपती यांनी सांगितले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव कांबळे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, अशोकराव जगताप, अशोक करांडे आदी उपस्थित होते. सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी या पुरस्काराची भूमिका मांडली. सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. आर्या देशपांडे हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. कविता तिवडे, संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव डॉ. युवराज भोसले यांनी आभार मानले.
चौकट
क्षमता वाढविणारे शिक्षण घ्यावे
विद्यार्थ्यांनी महत्त्वाकांक्षा, ध्येयनिश्चिती, धैर्य, चिकाटी, संशोधक वृत्ती विकसित करावे. त्यांनी स्वत:ची कार्यशैली निर्माण करण्याची क्षमता वाढविणारे शिक्षण घ्यावे. तांत्रिक शिक्षणामुळे आलेली संधी, मिळालेल्या माहितीचा उपयोग करून करिअर घडवावे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजींनी गोरगरिबांच्या मुला-मुलींना शिक्षणातून घडविण्याचे काम केले असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले.