‘सुंदर’ बाणेरगठ्ठाकडे रवाना
By Admin | Updated: June 6, 2014 01:39 IST2014-06-06T01:28:47+5:302014-06-06T01:39:55+5:30
अनेकांना अश्रू अनावर : पाचव्या दिवशी मोहिमेला यश

‘सुंदर’ बाणेरगठ्ठाकडे रवाना
वारणानगर : गेल्या दोन वर्षांपासून बहुचर्चित ठरलेल्या जोतिबा देवस्थानच्या ‘सुंदर’ हत्तीने अखेर आज, गुरुवारी पाचव्या दिवशी वारणानगर सोडले. काही केल्या वाहनात चढायला तयार नसलेल्या सुंदरला कोल्हापूर वनविभागाचे पथक आणि केरळा एलिफंट फेडरेशनच्या टीमने माईल सिडेशन डोस देऊन वाहनात चढविण्यात यश मिळविले. यावेळी आसपासच्या गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सुंदरला नेत असताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. कर्नाटकातील बाणेरगठ्ठा राष्ट्रीय उद्यानात उद्या, शुक्रवारी ‘सुंदर’ पोहोचेल.
आमदार विनय कोरे यांनी जोतिबाचे प्रतीक म्हणून ‘सुंदर’ हत्ती भेट दिला होता. सुंदर हत्तीचा डोंगरावर छळ केला जात असल्याचा आरोप करीत ‘पेटा’ या संस्थेने सुंदरची जोतिबा डोंगरावरून मुक्तता व्हावी, अशी मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. त्यावर सुनावणी होऊन सुंदरला तातडीने बाणेरगठ्ठा राष्ट्रीय उद्यानात हलवावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला वारणा उद्योग समूहाचे आमदार विनय कोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने कोरे यांची याचिका फेटाळून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. १५ जूनपूर्वी ‘सुंदर’ला बाणेरगठ्ठामध्ये हलवावे, असा आदेश दिला होता.
कोल्हापूरचा वनविभाग व केरळहून आलेल्या ‘एलिफंट ओनर फेडरेशन’चे तज्ज्ञ २५ जणांचे पथक ३१ मे रोजी वारणा येथे दाखल झाले होते. या पथकाने सुंदरला वाहनामध्ये चढविण्यासाठी सलग दोन दिवस मोहीम राबविली; परंतु सुंदर काही केल्या वाहनात चढायला तयार होत नव्हता. तीन दिवसांपूर्वी तो रात्रीच्या वेळी बिथरल्याने वनविभागाने ही मोहीम थांबविली होती. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पहाटे पाच वाजल्यापासून सुुंदरला हलविण्यासाठी कोल्हापूरचे वनसंरक्षक विजय शेळके यांच्यासह अधिकार्यांनी व ‘केरळा फेडरेशन’च्या टीमने मोहीम सुरू केली.
यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुंदरला पाहण्यासाठी आलेल्या नागरिक व सुंदरप्रेमींना मात्र पोलिसांनी अमृतनगर रस्त्यावर थांबविले होते. पोलीस व वनविभागाच्या वाहनांच्या ताफ्यातून ट्रकमधून सुंदरला हलविले. त्यावेळी सुंदरचे लांबूनच दर्शन घेताना अनेक सुंदरप्रेमी नागरिकांना अश्रू अनावर झाले. उद्या, शुक्रवारी रात्री कर्नाटकातील बाणेरगठ्ठा प्राणी संग्रहालयात सुंदर पोहोचेल, असे वनसंरक्षक विजय शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
असे चढविले ट्रकमध्ये
सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास केरळाचे तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिंद्रदेव व डॉ. सुनील यांनी रायफलच्या साहाय्याने सुंदरच्या मागील पायांच्या वरील बाजूस माईल सिडेशन डोस (इंजेक्शन) सोडला. डोसने सुंदरला पाऊणतास शांत केले. त्यानंतर केरळाच्या पथकाने हळूहळू सुंदरच्या चारही पायांना दोरखंड व साखळदंडाने बांधून चालवीत ट्रकमध्ये चढविले. सुंदरचा माहूत हैदर हा रात्रीपासूनच गायब असल्याचे सांगण्यात आले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुंदरला ट्रकमध्ये चढविण्यात या टीमला यश आले.
हैदरचे कुटुंबीय गहिवरले
‘सुंदर’चा माहूत हैदर त्याचा भाऊ व कुटुंबीय गेली अनेक वर्षे सुंदरची देखभाल करीत होते. सुंदर जोतिबा तसेच वारणा परिसरात चांगलाच रमला होता; परंतु सुंदरला कर्नाटकात हलविल्याने हैदरचे कुटुंबीय व सुंदरप्रेमी गहिवरून गेले. दिवसभर संपूर्ण वारणा परिसरात ‘सुंदर’चीच चर्चा होती.(प्रतिनिधी)