सावधान! सायबर क्राईम वाढतोय!

By Admin | Updated: July 9, 2015 23:42 IST2015-07-09T23:42:58+5:302015-07-09T23:42:58+5:30

रत्नागिरी जिल्हा : सहा महिन्यात आठ गुन्हे दाखल

Be careful! Cybercrime is growing! | सावधान! सायबर क्राईम वाढतोय!

सावधान! सायबर क्राईम वाढतोय!

राजेंद्र यादव - रत्नागिरी --आधुनिक जगाची चिंता झालेले आणि आजवर केवळ मोठ्या शहरांमध्येच रूजलेले सायबर क्राईमचे लोण आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. इंटरनेटची सहज उपलब्धता आणि मोबाईलची वाढती संख्या यामुुळे ग्रामीण भागातही सायबर क्राईमचे गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. चालू वर्षी पहिल्या सहा महिन्यातच जिल्ह्यात सायबरशी निगडीत आठ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील चार गुन्हे बनावट एटीएमचे असून, त्यांची उकल झाली आहे. संबंधितांचे पैसेही परत मिळाले आहेत. मात्र, भविष्यात सायबर क्राईम ही पोलिसांची सर्वांत मोठी डोकेदुखी होऊन बसणार आहे.
सायबर क्राईममध्ये प्रभावी काम केलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात सायबर क्राईमला प्रतिबंध घालण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी त्यांनी सायबर क्राईमचे एक केंद्र उभारले असून, यामध्ये पारंगत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाला जानेवारी ते मे २०१५ अखेर ४ गुन्ह्यांमध्ये चोरले गेलेले पैसे परत मिळवण्यात यश आले आहे. मे २०१५अखेर सायबर सेलकडे ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
जिल्ह्यात सायबर क्राईमचे प्रमाण अत्यल्प होते. डिसेंबर २0१४पर्यंत जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांची संख्या १५ होती. पण, यंदा २0१५मध्ये पहिल्या पाच महिन्यातच आठ गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये आधुनिकतेचा वापर वाढल्यामुळे या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. आपल्याला कंपनीकडून एक कोटीचे बक्षीस लागले आहे. त्यासाठी तुम्हाला काही टक्के म्हणजे दोन किंवा चार लाख रुपये भरावे लागतील, असे एस. एम. एस. येतात. पैशाच्या हव्यासापोटी अनेकांनी आठ ते बारा लाखांपर्यंत पैसे भरल्यानंतर फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. काहीवेळा आपण बँकेचे मॅनेजर बोलतोय, तुमच्या एटीएम कार्डाची मुदत संपली आहे, जुने कार्ड रद्द करुन तुम्हाला नवीन कार्ड दिले जाणार आहे. तुमचा सांकेतिक क्रमांक द्या, असे सांगून त्याद्वारे अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढले जातात. चोरट्यांकडून आधुनिक तंत्रांचा वापर करुन बँक खातेदारांना लक्ष्य करीत त्यांच्या खात्यातील रक्कम लंपास करण्याचे प्रकार वाढत आहेत.
डॉ. संजय शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक होण्याआधी पुणे येथे सायबर क्राईम विभागातच काम केले होते. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत सायबर क्राईमचे एक केंद्र उभारण्यात आले आहे. केंद्र प्राथमिक अवस्थेत असले तरी त्यात पारंगत असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक डॉ. शिंदे यांनी केली आहे. काही तक्रारी दिल्यानंतर त्यावर त्यांनी लगेच त्याला उत्तर दिल्याची उदाहरणे आहेत.

मोबाईलचा दुरूपयोग
मोबाईलवर असणाऱ्या सुविधांचा गैरवापर करण्याचे प्रकार छोट्या शहरात अगदी ग्रामीण भागातही पोहोचले आहेत. वसतिगृहात एका मुलाचा विवस्त्र असतानाच व्हिडिओ तयार करण्यात आल्याचा प्रकार संगमेश्वरमध्ये घडला होता. त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मोबाईलवर महिलेची अश्लिल चित्रफीत घेतल्याचा गुन्हा दापोली तालुक्यातील दाभोळ येथे नोंदला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रांवर आक्षेपार्ह मजकूर लिहून तो फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे घडला आहे. या सर्वच प्रकरणांचा तपास सुरू आहे. वेबसाईटवर अश्लिल चित्रफीत टाकण्यात आल्याचा प्रकारही घडला असून, त्याबाबतही गुन्हा दाखल झाला आहे.रत्नागिरीत सायबर क्राईमचे केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून सायबर गुन्हे हाताळले जात आहेत. हळूहळू हे केंद्र सायबर क्राईमच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्यादृष्टीने गती घेत असल्याचे सांगण्यात आले.

लोकांचे दुर्लक्ष
अनोळखी माणसांना आपल्या एटीएमचा नंबर देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी अनेकदा केले आहे. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून हे आवाहन करताना तसे संदेशही अनेकदा मोबाईलवरून देण्यात आले आहेत. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून लोक आपला नंबर अनोळखी लोकांकडे देत आहेत. कुठल्याही बँकेचा मॅनेजर फोनवरून एटीएम नंबर विचारत नाही आणि तो विचारूही शकत नाही. त्यामुळे अशा बोलण्याला लोक फसले नाहीत तर खात्यातून परस्पर पैसे काढण्यासारखे प्रकार होणारच नाहीत. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच असे प्रकार करणाऱ्यांना रान मोकळे मिळते. याबाबत वारंवार बँकांकडून जागृती केली जाते. तरीही ग्राहक या फसवेगिरीला फसतो आणि दृष्टचक्रात अडकतो.

एटीएमबाबत फसवणूक
मी बँकेतून मॅनेजर बोलतोय, तुमच्या एटीएमचा नंबर सांगा, असे सांगणारा फोन मोबाईलवर येतो आणि संबंधिताने आपला एटीएम नंबर सांगितल्यानंतर खात्यातून पैसे वजा झाल्याचा संदेश त्याला येतो. रत्नागिरी जिल्ह्यात चालू वर्षी पाच महिन्यात असे चार प्रकार घडले आहेत. ज्या दूरध्वनी क्रमांकावरून हे फोन केले जातात, अशा मोबाईल नंबरचा पाठपुरावा करून रत्नागिरीच्या सायबर सेलने चारही गुन्हे उघड केले आहेत आणि संबंधितांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.

Web Title: Be careful! Cybercrime is growing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.