स्त्रीभू्रणहत्या रोखण्यास सक्रिय व्हा
By Admin | Updated: March 9, 2017 00:20 IST2017-03-09T00:20:25+5:302017-03-09T00:20:25+5:30
कुणाल खेमनार : जि. प.मध्ये महिला दिनी ४८ अंगणवाडी सेविकांसह सात आरोग्य केंद्रांचा गौरव

स्त्रीभू्रणहत्या रोखण्यास सक्रिय व्हा
कोल्हापूर : आईच्या मायेने अंगणवाडी सेविका काम करीत असून, जणू त्या मुलांच्या भविष्याचीच काळजी करतात, अशा शब्दांत कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी अंगणवाडी सेविकांचा गौरव केला. तसेच स्त्रीभू्रण हत्येचा कलंक पुसण्यासाठीही महिलांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात बुधवारी सकाळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष विमल पाटील होत्या.
डॉ. खेमनार म्हणाले, आता सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांची कर्तबगारी दिसून येत असून, प्रत्येक यशस्वी कामामध्ये महिलांचा समावेश असतो, हे अभिमानास्पद आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिला मतदारांची नोंदणी आवश्यक असून, यासाठीही महिलांनी सक्रिय पुढाकार घेऊन मतदार जागृती आणि मतदार नोंदणीमध्ये अग्रभागी राहावे. जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्र्ती उमेशचंद्र मोरे म्हणाले, महिला सर्व क्षेत्रांत पुढे येत आहेत, ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. मात्र महिलांवर होणारा कौटुंबिक हिंसाचार ही चिंतेची बाब असून, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी विविध कायद्यांविषयी महिलांमध्ये साक्षरता निर्माण करणे आवश्यक बनले आहे.
अध्यक्ष विमल पाटील, महिला व बालविकास विभागाच्या सभापती ज्योती पाटील, आरोग्य समितीच्या सभापती सीमा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या राणी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अनघा सूर्यवंशी आणि सिद्धी बेलेकर या छोट्या मुलींनी त्यांच्या मनोगतातून उपस्थित सर्वांची मने जिंकली. यावेळी नवमहिला मतदारांना निवडणूक ओळखपत्रांचे वितरण, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या जनजागृती कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. पिराचीवाडी (ता. कागल) येथील अंगणवाडी सेविका सुवर्णा पाटील यांनी १ जानेवारी ते २६ जानेवारी २०१६ या कालावधीत जन्मलेल्या गावातील १२ मुलींच्या नावे १२ हजार रुपयांची ठेव ठेवली, याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते १६ प्रकल्पांतील ४८ अंगणवाडी सेविकांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच माळ्याची शिरोली, जयसिंगपूर, कळे (ता. पन्हाळा) या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा व शेळोली (ता. भुदरगड), निगवे (ता. करवीर) व तेलवे (ता. पन्हाळा) आरोग्य उपकेंद्रांचा व कसबा बावडा येथील ग्रामीण सेवा रुग्णालयाचा डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक हरीश जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्यासह अनेक पदाधिकारी, सदस्य, सदस्या, अंगणवाडी सेविका, परिवेक्षक, आरोग्याधिकारी उपस्थित होते. संजय लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.
आईच्या मायेने अंगणवाडी सेविका काम करीत असून, जणू त्या मुलांच्या भविष्याचीच काळजी करतात.
- कुणाल खेमनार,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद