केवळ घोषणांचाच आधार ; निराधारांना एक हजारांची मदत कधी मिळणार? ( नियोजनातील विषय, डमी पाठवली आहे. )
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:13+5:302021-05-09T04:24:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात विविध योजनांचे लाभार्थी असलेल्या नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी ...

केवळ घोषणांचाच आधार ; निराधारांना एक हजारांची मदत कधी मिळणार? ( नियोजनातील विषय, डमी पाठवली आहे. )
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात विविध योजनांचे लाभार्थी असलेल्या नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेली एक हजार रुपयांची मदत अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही, जिल्हा प्रशासनाकडे तसे अध्यादेश आलेले नाहीत. मात्र या योजनांमधील पुढील दोन महिन्यांची आगावू रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. हिच रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे की वाढीव एक हजाराची मिळणार आहे याबाबत लाभार्थ्यांमध्ये ही संभ्रम कायम आहे.
राज्यात सध्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू असून ब्रेक द चेन अंतर्गत १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे याकाळात गरीब, गरजू नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी राज्य शासनाने रिक्षाचालक, मोलकरीण, तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. त्यानुसार संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना एक हजारांची मदत मिळणार होती, मात्र जिल्हा प्रशासनाकडे
तसा कोणताही अध्यादेश आलेला नाही.
या लाभार्थ्यांना महिना पूर्ण झाला की रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जात होती. पण शासनाच्या सूचनेनुसार यंदा ती आगावू जमा करण्यात आली आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर आले आहे.
--
योजना : लाभार्थी संख्या
संजय गांधी निराधार सर्वसाधारण योजना : ३८ हजार ६५३
संजय गांधी निराधार अनुसूचित जाती योजना : ६ हजार ५२७
श्रावणबाळ योजना : ७० हजार ६०३
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना : २१ हजार ७०७
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना : १ हजार ८८०
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना : १४७
एकूण लाभार्थी : १ लाख ३९ हजार ५१७
---
योजनेच्या रकमेत सारखे बदल होतात. कधी ५००, ६०० आता दहा रुपये मिळतात. या महिन्यात १ हजार रुपये जादा रक्कम मिळणार असं कळालं होतं अजून माझ्या खात्यात हे पैसे मिळाले नाहीत. पेन्शन मात्र मिळाली आहे.
सदाशिव पाटील (लाभार्थी)
--
मला पॅरालिसिस झाले आहे, घराबाहेर जाता येत नाही. पत्नीला ही घरी थांबावे लागते. संजय गांधी योजनेतून दर महिन्याला हजार रुपये मिळतात. औषध पाण्यावरच ८००-९०० रुपये जातात. यातनं घर कसं भागायचं.
पांडुरंग जाधव (लाभार्थी)
--
माझा मुलगा सहावीला आणि मुलगी सातवीला आहे. मी शिवणकाम करते. हे काम आणि पेन्शनवरच कसंबसं घर चालवते. या महिन्यात पेन्शनची रक्कम जमा झाली आहे. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन रकमेत वाढ केली पाहिजे.
सविता पाटील (लाभार्थी)
--
श्रावणबाळ योजनेत मला पेन्शन मिळते. या महिन्यात जास्तीचे पैसे येणार होते म्हणतात अजून तर आमच्या खात्यावर पैसे आले नाहीत. दर महिन्याला मिळणाऱ्या पैशाचा मोठा आधार असतो.
इंदुबाई माळी (लाभार्थी)
---
मी दिव्यांग असून या योजनेखाली मला पेन्शन मिळते. नेहमी महिना अखेरीस किंवा एक दोन महिन्यांनी पैसे मिळायचे आता काय झालंय हे काही कळालेले नाही. जास्तीची रक्कम काही अजून आलेली नाही.
सचिन पाटील (लाभार्थी)
--