‘सीटीएस’ प्रणालीत बॅँकांनी सहभागी व्हावे
By Admin | Updated: August 24, 2014 00:54 IST2014-08-24T00:53:42+5:302014-08-24T00:54:53+5:30
प्रमोद कर्नाड यांचे सहकारी बॅँकांना आवाहन : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत सहकारी बॅँकांच्या प्रतिनिधींची बैठक

‘सीटीएस’ प्रणालीत बॅँकांनी सहभागी व्हावे
कोल्हापूर : रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार राज्य बॅँकेने कोल्हापूर शाखेत ‘सीटीएस’ प्रणाली सुरू केली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील नागरी सहकारी बॅँकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सहकारी बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत राज्य बॅँकेच्या वतीने जिल्ह्यातील सहकारी बॅँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ते बोलत होते. एप्रिल २०१४ पासून रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बॅँकेसह सर्वच नागरी सहकारी बॅँकांना ‘सीटीएस’ची सक्ती केली आहे. धनादेश वटविण्यासाठी तो संबंधित बॅँकेकडे पाठवावा लागत होता. या प्रक्रियेला बराच विलंब लागत असल्याने ग्राहकांची अडचण होते. याउलट राष्ट्रीयीकृत बॅँका फारच पुढे गेल्या आहेत. यासाठी रिझर्व्ह बॅँकेने राज्य बॅँक, जिल्हा बॅँकांसह नागरी सहकारी बॅँकांना ‘सीटीएस’ची सक्ती केली आहे. त्यानुसार राज्य बॅँकेने कोल्हापूर शाखेत ही सुविधा सुरू केली असून, त्यामध्ये जिल्ह्यातील बॅँकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमोद कर्नाड यांनी केले.
जिल्ह्यातील काही बॅँकांनी ही सुविधा अगोदरच दुसऱ्या यंत्रणेकडून घेतली आहे. त्यांनी आता काय करायचे अशी विचारणा बॅँकांच्या प्रतिनिधींनी केली. बॅँकेकडून नाममात्र फी घेतली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत ही सुविधा बॅँकांना उपलब्ध करून दिली जाणार असून, जिल्ह्यातील बॅँकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे कर्नाड यांनी सांगितले. जिल्हा बॅँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, राज्य बॅँकेचे व्यवस्थापक सुधीर केदार, जिल्हा बॅँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, यशवंत बॅँकेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देसाई यांच्यासह बॅँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य बॅँकेचे शाखा सहव्यवस्थापक राजेंद्र बकाल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘सीटीएस’ सुविधा मोफत करा
राज्य बॅँकेने पालकत्वाच्या नात्याने नागरी बॅँकांना ‘सीटीएस’ सुविधा मोफत द्यावी, अशी मागणी बॅँक प्रतिनिधींनी केली. यावर नाममात्र फी आकारली आहे. व्यवसाय किती होतो, हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रमोद कर्नाड यांनी सांगितले.
‘सीआरएआर’ची अट
ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी संबंधित बॅँकेच्या चालू खात्यावरील रकमेबाबत अट घालण्यात आली आहे. बॅँकेच्या ‘सीआरएआर’च्या
२५ टक्के रक्कम चालू खात्यावर असणे बंधनकारक आहे.
कशी असणार फी...
४बॅँकेत येणाऱ्या चेकसाठी एक रुपया
४जाणाऱ्या चेकसाठी पन्नास पैसे