कोल्हापूर शहरात गर्दीच्या वेळीच अवजड वाहनांना बंदी घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:47 IST2018-12-26T13:46:04+5:302018-12-26T13:47:29+5:30
कोल्हापूर शहरात सकाळी १0 ते ११ आणि सायंकाळी पाच ते सहा या अधिक रहदारी आणि गर्दीवेळीच अवजड वाहनांना बंदी घालावी. इतर वेळेत या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी गांधीनगर गुडस् मोटार मालक संघाने केली. या मागणीचे निवेदन संघाच्या शिष्टमंडळाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांना दिले.

कोल्हापूर शहरात गर्दीच्या वेळीच अवजड वाहनांना बंदी घाला
कोल्हापूर : शहरात सकाळी १0 ते ११ आणि सायंकाळी पाच ते सहा या अधिक रहदारी आणि गर्दीवेळीच अवजड वाहनांना बंदी घालावी. इतर वेळेत या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी गांधीनगर गुडस् मोटार मालक संघाने केली. या मागणीचे निवेदन संघाच्या शिष्टमंडळाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांना दिले.
शहरामध्ये अवजड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत प्रवेश बंद केल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. ही वेळ खूपच अवघड आणि त्रासदायक आहे; कारण, सकाळी नऊ वाजता कोणताही व्यापारी दुकान उघडत नाही.
रात्री नऊवाजेपर्यंत दुकान सुरू ठेवत नाही; त्यामुळे ही वेळ पूर्णत: चुकीची आहे; त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना डोअर डिलेव्हरी देणे अशक्य झाले आहे. कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांना रोज साखर, चहा, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या ट्रान्सपोर्टधारकांकडून पुरविल्या जातात.
सध्या प्रायोगिक तत्त्वावरील वेळ ही अवजड वाहनांसाठी कायमस्वरूपी निश्चित केल्यास कोल्हापूरमधील ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत येऊ शकतो; त्यामुळे सध्याच्या सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेमध्ये बदल करून, अधिक रहदारी आणि गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास बंदी घालावी.
इतर वेळेमध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष आयुब मुजावर, खजानीस संतोष तावडे, संचालक अनुप महाजन, विक्रम शिंदे, आदींचा समावेश होता.