कोल्हापूर : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या मे अखेर बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढून हा लढा अधिक तीव्र व एकजुटीने लढण्याचा निर्णय गुरुवारी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत आमच्या जमिनी देणार नाही, असा निर्धारही शेतकऱ्यांनी यावेळी केला. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील अध्यक्षस्थानी होते. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील शेतकरी या बैठकीला उपस्थित होते.सतेज पाटील म्हणाले, आमचा विकासाला विरोध नाही, मात्र, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका. या महामार्गाविरोधातील लढा अधिक जोमाने लढला जाणार असून शेतकऱ्यांनी आता जास्तीत जास्त ग्रामसभेचे ठराव घेऊन याला विरोध करावा. शेतकऱ्यांवर कुणी जमीन भूसंपादनासाठी दबाव टाकला तर ते आम्ही त्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. येत्या मे अखेरीस शक्तीपीठाविरोधात बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढून हा लढा तीव्र करू.माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, या महामार्गामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान होणार आहे. महामार्गाच्या भरावामुळे कोल्हापूर, सांगली आणखी पाण्यात जाईल. सह्याद्रीचा डोंगर फाेडून हा रस्ता केला तर पर्यावरणाची सर्वात मोठी हानी होईल. त्यामुळे या लढ्यात शेतकऱ्यांसह सर्व घटकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. या लढ्यासाठी आता बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढून प्रत्येक तालुक्यात मेळावे घेऊया. यावेळी आमदार कैलास पाटील, माजी आमदार वैभव नाईक, उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह विजयकुमार पाटील, अजय बुरांडे, सतीश लळीत, गजेंद्र येळकर, उमेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रांताधिकाऱ्याचे पाद्यपूजनसोलापूरचे विजयकुमार देशमुख म्हणाले, इतका टोकाचा विरोध करूनही सरकार आपले ऐकत नसेल तर आता भूसंपादनासाठी आलेल्या प्रांताधिकाऱ्यांचे पाद्यपूजन करूया. सिंधुदुर्गचे सतीश कुलकर्णी यांनी शक्तीपीठ विरोधी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा पर्याय सुचविला.हनुमानगडाचा बुरुज ढासळून महामार्गकोकणात पारगडजवळच्या हनुमानगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य राहिले आहे. अशा ऐतिहासिक गडाचा बुरुज ढासळून शक्तीपीठ महामार्ग करण्यात येणार असल्याकडे जयेंद्र परुळेकर यांनी लक्ष वेधले.