किरवले हत्येच्या निषेधार्थ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 00:41 IST2017-03-09T00:41:07+5:302017-03-09T00:41:07+5:30
कुरुंदवाड, गडहिंग्लजमध्ये प्रतिसाद : समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी

किरवले हत्येच्या निषेधार्थ बंद
गडहिंग्लज / कुरुंदवाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे प्रचारक, संशोधक डॉ. प्रा. कृष्णा किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ येथील सर्वपक्षीय सामाजिक व दलित संघटनेच्यावतीने बुधवारी कुरुंदवाड व गडहिंग्लजमध्ये बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी संपूर्ण व्यवहार बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. यावेळी हत्या करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.
कुरुंदवाड येथे प्रारंभी सकाळी विविध सामाजिक संघटना व दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातून निषेध फेरी काढली. यावेळी डॉ. किरवले अमर रहे, किरवले सरांची हत्या करणाऱ्या समाजकंटकाचा निषेध असो, अशा घोषणा देण्यात आल्या. निषेध फेरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येताच कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी रामदास मधाळे, गौतम ढाले, सुनील कुरुंदवाडे, रामदास आवळे, दिलीप आवळे, संजय कांबळे, चंद्रकांत मोरे, आयुब पट्टेकरी,
सतीश भंडारे, शाहीर आवळे, संजय शिंदे, बसाप्पा कांबळे, दिनेश कांबळे यांच्यासह विविध संघटना,
दलित संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बंद शांततेत पाळण्यात आला. (प्रतिनिधी)
संघटनांचा सहभागी
गडहिंग्लज येथे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या गडहिंग्लज बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध दलित संघटना व ‘दानिविप’ संघटनेतर्फे बंदचे आवाहन करण्यात आले होते.
दुपारी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांना निवेदन देण्यात आले. किरवलेंच्या हत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बाबूराव ऐवाळे, प्रकाश कांबळे, दिलीप कांबळे, शिवाजी नाईक, परशराम कांबळे, रमजान अत्तार यांची भाषणे झाली.