जोतिबा खेट्यांवर बंदी,केवळ धार्मिक विधींना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 13:06 IST2021-02-26T13:03:06+5:302021-02-26T13:06:49+5:30
Jyotiba Temple Coronavirus Kolhapur- वाढल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अवर सचिव तथा सचिवांना पाठवले आहे.

जोतिबा खेट्यांवर बंदी,केवळ धार्मिक विधींना परवानगी
कोल्हापूर : वाढल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अवर सचिव तथा सचिवांना पाठवले आहे.
दरवर्षी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे होणाऱ्या श्री जोतिबा खेट्यांसाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर व परिसरात होते. यंदादेखील रविवारपासून (दि. २८) पुढील चार रविवारी खेट्यांसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत २८ फेब्रुवारी रोजी रात्री बारापर्यंत वाढवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील कोविड रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याबाबत निर्देश देऊन त्यांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सूचित केले आहे. त्या अनुषंगाने यात्रा, उत्सव, उरूस यावर बंदी घालण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र देवस्थान समितीला पाठवले असून त्यात वाडी रत्नागिरी येथे पुढील चार रविवारी होणारे जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु, पारंपरिक पध्दतीने धार्मिक पूजा विधी करण्यास कमीत कमी मानकरी-पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे. मात्र श्री जोतिबा खेटे कार्यक्रमास भाविकांना व नागरिकांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे म्हटले आहे.
--