शिलकी अंदाजपत्रक तरीही पाणीपट्टीत वाढ
By Admin | Updated: February 23, 2015 23:57 IST2015-02-23T23:41:32+5:302015-02-23T23:57:07+5:30
कागल नगरपालिका : चुकीचे अंदाजपत्रक असल्याचा विरोधकांचा आरोप

शिलकी अंदाजपत्रक तरीही पाणीपट्टीत वाढ
कागल : कागल नगरपरिषदेचे २०१५ -१६ या वर्षाचे २८ लाख २५ हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सोमवारी सर्वसाधारण सभेत किरकोळ चर्चा आणि दुरुस्तीनंतर मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा आशाकाकी माने होत्या. उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, मुख्याधिकारी प्रभाकर पत्की प्रमुख उपस्थित होते. ५१ कोटी १८ लाख १७ हजार रुपये जमा आणि ५० कोटी ८९ लाख २० हजार ५५३ खर्च असे या अंदाजपत्रकाचे स्वरूप आहे. शिलकी अंदाजपत्र असताना पाणी पट्टी वाढविल्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.सुरुवातीला महिला नगरसेविकांना सभेस येण्यास विलंब झाल्याचा मुद्दा सभागृहाच्या लक्षात आणून देत विरोधी नगरसेवक भैया इंगळे, संजय कदम यांनी कोरमअभावी सभा तहकूब करावी, अशी मागणी केली. त्यावर पक्षप्रतोद रमेश माळी, संजय चितारी यांनी कोरम पूर्ण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पालिकेकडे शिल्लक किती रक्कम आहे, आर्थिक स्थिती काय आहे याचा खुलासा होत नसल्याने हे चुकीचे अंदाजपत्रक असल्याचा आरोप करीत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. मारुती मदारे यांनी क्रीडा महोत्सवासाठी तरतूद करावी, अशी मागणी केली. मनोहर पाटील, नम्रता कुलकर्णी, आदींनीही सूचना आणि मागण्या यावेळी केल्या.
पालिकेचे शिल्लक १२ कोटी ८६ लाख ६० हजार, करापासूनचे उत्पन्न २७ लाख ५० हजार, मालमत्ता महसूल एक कोटी नऊ लाख ७१ हजार ५००, महसुली अनुदान - ४ कोटी २६ लाख ६३ हजार, भांडवली अनुदान - ३९ कोटी ५४ लाख २५ हजार अशी मिळून जमा रक्कम, तर अस्थापना खर्च - ४ कोटी ५६ लाख २६ हजार ५५०, सार्वजनिक सुरक्षा - ५५ लाख ८५ हजार, सार्वजनिक आरोग्यासाठी २ कोटी २८ लाख रुपये अनुदान, वर्गणीसाठी ३३ लाख ६३ हजार, किरकोळ खर्च - ५५ लाख १६ हजार, कर्जासाठी ३ कोटी ५१ लाख, तर भांडवली अनुदानासाठी ३९ कोटी ६१ लाख ६ हजार रुपये खर्चाची तरतूद आहे. ( प्रतिनिधी )
मंजूर झालेले काही मुद्दे
वार्षिक पाणीपट्टीत दहा टक्के वाढ.
अपंग कल्याण तरतूद - पाच लाख रुपये.
व्याख्यानमाला - तीन लाख रुपये.
लेक वाचवा अभियान - तीन लाख रुपये.
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तरतूद.
लोक वर्गणीसाठी ५० लाखांची तरतूद.
हद्दवाढ क्षेत्रातील विकासकामांसाठी स्वतंत्र तरतूद.
रमाई आवास योजना अनुदान - एक कोटी ६५ लाख रुपये.
नगरपालिका वाचनालय पुस्तके खरेदी - एक लाख रुपये.