बालगोपालचा खंडोबावर विजय
By Admin | Updated: December 5, 2014 00:52 IST2014-12-05T00:50:14+5:302014-12-05T00:52:04+5:30
केएसए फुटबॉल लीग : ‘कोल्हापूर पोलीस’ची ‘पॅट्रियट’वर एकतर्फी मात

बालगोपालचा खंडोबावर विजय
कोल्हापूर : के. एस. ए. लीग फुटबॉल सामन्यात आज, गुरुवारी कोल्हापूर पोलीस संघाने पॅट्रियट स्पोर्टस्वर २-० अशी एकतर्फी मात केली; तर दुसऱ्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने रोहित कुरणेच्या एकमेव गोलवर खंडोबा तालीमचा पराभव केला.
छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेत दुसरा सामना बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला. बालगोपालने खंडोबाच्या गोलक्षेत्रात प्रारंभापासून सातत्याने खोलवर चढाया केल्या. मात्र, खंडोबाच्या सजग बचावफळीमुळे त्या निष्प्रभ ठरल्या.
उत्तरार्धात, बालगोपालकडून अभय संभाजीचे, रोहित कुरणे, सचिन गायकवाड यांनी खंडोबाच्या गोलक्षेत्रात अनेक खोलवर चढाया केल्या. अखेर ५२ व्या मिनिटास ऋतुराज पाटीलच्या पासवर रोहित कुरणे याने गोलची नोंद करीत बालगोपालला १-० अशी आघाडी मिळवून दिली. खंडोबाला अखेरपर्यंत सामन्यात बरोबरी करता आली नाही. त्यामुळे सामना बालगोपालने १-० असा जिंकला.
दुपारच्या सत्रातील पहिला सामना कोल्हापूर पोलीस संघ विरुद्ध पॅट्रियट स्पोर्टस् यांच्यात झाला. पोलीस संघाच्या सोमनाथ लांबोरे, अमोल चौगुले, रोहित ठोंबरे, संतोष तेलंग यांनी पूर्वार्धात पॅट्रियट संघावर दबाव निर्माण केला होता.
उत्तरार्धात पॅट्रियटकडून नईमुद्दीन सय्यद, मैन्नुद्दीन सय्यद, संदीप पाटील, साई वडणगेकर यांनी पोलीस संघावर गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. ५२व्या मिनिटास पोलीस संघाकडून अमोल चौगुले याने मैदानी गोलची नोंद करीत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्यात बरोबरी साधण्यासाठी पॅट्रियटकडून साई वडणगेकर, रजत शेट्टी, संतोष निकम, संदीप पाटील यांनी अनेक खोलवर चढाया करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस संघाचा गोलरक्षक अमर आडसूळ व भक्कम बचावफळीमुळे त्यांचे प्रयत्न निष्प्रभ ठरले. ६६ व्या मिनिटास पोलीस संघाच्या सोमनाथ लांबोरे याने गोलची नोंद करीत आपल्या संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी शेवटपर्यंत राहिल्याने सामना पोलीस संघाने २-० असा जिंकला. (प्रतिनिधी)
शनिवारी होणारे सामने-
दु .२:०० वाजता - शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार ‘अ’
दु. ४:०० वाजता - संध्यामठ विरुद्ध साईनाथ स्पोर्टस्.
शुक्रवारी सामने होणार नाहीत.