‘बालगोपाल’ अंतिम फेरीत --पाटाकडील ‘अ’वर टायब्रेकरवर मात :
By Admin | Updated: February 13, 2015 23:24 IST2015-02-13T23:13:07+5:302015-02-13T23:24:03+5:30
घारगे स्मृती फुटबॉल चषक स्पर्धा

‘बालगोपाल’ अंतिम फेरीत --पाटाकडील ‘अ’वर टायब्रेकरवर मात :
कोल्हापूर : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघास ४-३ अशी टायब्रेकरवर मात देत अवधूत घारगे स्मृती फुटबॉल चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. लढवय्या खेळाडू म्हणून पाटाकडील (अ)चा गोलरक्षक शैलेश पाटील यास गौरविण्यात आले.छत्रपती शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी ‘बालगोपाल’ विरुद्ध पाटाकडील (अ) यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक व चुरशीच्या खेळाचे प्रदर्शन केले. पाटाकडील ‘अ’कडून ९ व्या मिनिटास रूपेश सुर्वे याने मैदानी गोल नोंदवीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी काही काळच टिकली. ११व्या मिनिटास ‘बालगोपाल’कडून जयकुमार पाटील याने गोल नोंदवीत सामन्यात १-१ अशी बरोबरी आणली. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. ‘बालगोपाल’च्या ऋतुराज पाटील व रोहित कुरणे यांचे गोल करण्याचे प्रयत्न पाटाकडील (अ)चा गोलरक्षक शैलेश पाटील याने निष्फळ ठरविले; ‘बालगोपाल’कडून सचिन गायकवाड, आशिष कुरणे, रोहित कुरणे, ऋतुराज पाटील, तर पाटाकडील (अ)कडून उत्सव मरळकर, अक्षय मेथे-पाटील, ऋषिकेश मेथे-पाटील, अजिंक्य नलवडे, नियाज पटेल, दीपक थोरात यांनी वेगवान व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ५७ व्या मिनिटास ‘बालगोपाल’च्या पेनल्टी क्षेत्रात आशिष कुरणे याने चेंडू हाताळल्याबद्दल पंचांनी पाटाकडील (अ)ला पेनल्टी बहाल केली. यावर अक्षय मेथे-पाटील याने अचूक गोल नोंदवीत २-१ अशी आघाडी वाढविली. सामन्यात बरोबरी साधण्यासाठी ‘बालगोपाल’च्या खेळाडूंनी जिवाचे रान केले. सामन्याच्या शेवटच्या पाच सेकंदांत ‘बालगोपाल’च्या अजिंक्य जाधव याने गोल नोंदवीत सामना बरोबरीत आणला. यावर टायब्रेकरचा अवलंब केला. यामध्ये ‘बालगोपाल’ने ४-३ असा सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.