कोल्हापूर : सासने ग्राउंड येथील जोधपूर मिष्टान्नचे मालक प्रकाश कुकाराम चौधरी (वय ३५, रा. अक्षर प्लाझा, ताराबाई पार्क) यांचे अपहरण करून ५० हजारांची मागणी करणाऱ्या तिघांच्या शाहूपुरी पोलिसांनी तीन तासांत मुसक्या आवळल्या. ओमकार गजानन झुंजारे (२५), स्वरूप श्रीकांत लिमकर (२१, दोघे रा. कदममळा, उचगाव) आणि विशाल विलास जगताप (२८, रा. हॉकी स्टेडियम चौक, कोल्हापूर) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि. २३) रात्री साडेअकरा ते अडीचच्या दरम्यान घडला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश चौधरी यांची सासने ग्राउंडसमोर जोधपूर मिष्टान्न ही बेकरी आहे. ओमकार झुंजारे हा त्यांच्याकडे बेकरीचे साहित्य पुरवत होता. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तो चौधरी यांच्या घरासमोर आला. फोन करून मला भूक लागलीय. काहीतरी खायला द्या, असे म्हणत त्याने चौधरी यांना बाहेर बोलावले. इमारतीच्या खाली येताच त्याने हाताला पकडून चौधरी यांना जबरदस्तीने कारच्या मागील सिटवर बसवले. त्यानंतर कार भरधाव वेगाने राजर्षी शाहू मार्केट यार्डकडे गेली. कारमध्येच त्याला कुकरीचा धाक दाखवत मारहाण करून तिघांनी ५० हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान, त्याचवेळी चौधरी यांच्या मोबाइलवर शाहूपुरी पोलिसांचा फोन आला. त्यांचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे समजताच अपहरणकर्त्यांनी चौधरी यांना सासने ग्राउंडसमोर सोडून पोबारा केला. तसेच पोलिसात तक्रार दिलीस तर जिवंत सोडणार नाही, असे धमकावले.
तीन तासांत अटकप्रकाश चौधरी याला कोणीतरी जबरदस्तीने कारमध्ये बसवून घेऊन गेल्याचे त्यांचा भाऊ रमेश चौधरी यांनी पाहिले होते. मोबाइलवर बऱ्याचदा फोन करूनही तो उचलत नसल्याने रमेश यांना अपहरण झाल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक डोके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने संशयितांचा शोध सुरू केला. विशाल जगताप याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर ओमकार झुंजारे आणि स्वरूप लिमकर यांना अवघ्या तीन तासांत अटक केली. यातील जगताप याच्यावर यापूर्वी अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांचा फोन अन् अपहरणकर्त्यांची पळापळशाहूपुरी पोलिसांचा फोन चौधरी यांच्या मोबाइलवर आल्याचे समजताच अपहरणकर्ते घाबरले. मोबाइल लोकेशनवरून पोलिस आपल्यापर्यंत पोहोचतील या भीतीने त्यांनी तातडीने चौधरी यांना पुन्हा सासने ग्राउंडजवळ सोडले. तरीही तीन तासांत ते पोलिसांच्या हाती लागलेच.