महिलांसाठी जिजाऊंच्या नावाने बाेगस योजनेचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST2021-03-06T04:22:51+5:302021-03-06T04:22:51+5:30
कोल्हापूर : कोरोना काळात विधवा झालेल्यांना ५० हजार रुपयांचा लाभ देण्याचे आमिष दाखविणाऱ्या जिजाऊ नावाने योजनेच्या मोबाईलवरील संदेशाने सध्या ...

महिलांसाठी जिजाऊंच्या नावाने बाेगस योजनेचा धुमाकूळ
कोल्हापूर : कोरोना काळात विधवा झालेल्यांना ५० हजार रुपयांचा लाभ देण्याचे आमिष दाखविणाऱ्या जिजाऊ नावाने योजनेच्या मोबाईलवरील संदेशाने सध्या धुमाकूळ घातला आहे. दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, तो गुजरातमध्ये लागतो. त्यामुळे फसवणुकीचे हे नेमके कनेक्शन काय आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. राज्यात शिवसेनेसह महाविकास आघाडीचे सरकार आणि जिजाऊंच्या नावाने योजना असल्याने लोकांना ती खरी आहे, असे वाटत आहे.
महिला बालकल्याण विभागाच्या नावाने बोगस योजनांची माहिती देऊन महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार आतापर्यंत भरपूर झाले आहेत. फसवणुकीबद्दल गुन्हेही दाखल झाले आहेत, तरीदेखील दरवर्षी मोठ्या व्यक्तीचे नाव घेऊन दरवर्षी योजना येते, तसे संदेश मोबाईलवर फिरतात, गावोगावी प्रचार केला जातो. यावर्षीदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून मोबाईलवर जिजाऊंच्या नावाने महिला बालकल्याण विभागाची योजना असल्याचा संदेश फिरत आहे. २१ ते ७० वयोगटातील महिलांना हा लाभ देणार आहे, असे म्हटले आहे. यासाठी १ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घरातील कर्त्या पुरुषाचे काेरोनामुळे निधन झाले असल्यास त्यांच्या विधवा पत्नींना ५० हजार रुपये दिले जातील, असे म्हटले आहे. संपर्कासाठी ७०१६१६९०४५ हा मोबाईल क्रमांकही दिला असून, पूजा रमेश पाटील ऊर्फ पूजा आकाश ठक्कर यांना संपर्क करावा, असे म्हटले आहे. ‘लोकमत’ने याची शहानिशा करण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला, तर त्याचे लोकेशन गुजरात दाखवते. शिवाय गुजराती ट्यून ऐकू येते. हा फोन स्वीच ऑफ आहे, असे गुजराती, हिंदी व इंग्रजीतून सांगितले जाते. यावरून त्याची बोगसगिरी उघड होते.
चौकट ०१
महिला बालकल्याण विभागाला फुकटचा मन:स्ताप
या योजनेच्याबाबतीत जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विचारणा करणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. रोज किमान दहाहून जास्त फोन चौकशीसाठी येत आहेत. अशी कोणतीही योजना नाही, ती बोगस आहे, हे सांगण्यातच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जास्त वेळ जात आहे. काम कमी, मन:स्ताप जास्त, अशी परिस्थिती झाली आहे.
प्रतिक्रिया
अशाप्रकारची कोणतीही योजना राज्य सरकार, महिला बालकल्याण विभाग राबवत नाही. ही योजना पूर्णपणे बोगस आहे. महिलांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
सोमनाथ रसाळ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला बालकल्याण जिल्हा परिषद, कोल्हापूर.