शालेय पोषण आहारासाठी निकृष्ट चटणीचा पुरवठा
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:07+5:302016-03-16T08:36:08+5:30
राजेंद्र सूर्यवंशी यांचा इशारा : चटणी जप्त करा, अन्यथा जिल्हा परिषदेच्या दारात टाकू

शालेय पोषण आहारासाठी निकृष्ट चटणीचा पुरवठा
कोपार्डे : कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना शालेय पोषण आहारासाठी पुरविण्यात आलेली चटणी काळी, कुबट व दर्जाहीन असल्याने मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या तिखटाच्या दर्जाबाबत यंत्रणेकडे तक्रारी होऊन देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने पोषण आहार पुन्हा वादाच्या चर्चेत सापडला आहे.
ठेकेदारांकडून पुरवठा होणारे धान्य अनियमित, दर्जाहीन असल्याच्या वारंवार तक्रारी होत असल्याने शालेय पोषण आहार नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. संपूर्ण राज्यभर या पोषण आहारासाठी एकच ठेकेदार असून मार्केटिंग फेडरेशनकडून त्याचा पुरवठा होतो. अनेकवेळा तांदूळ, तुरडाळ व तत्सम धान्यात अळ्या, उंदराच्या लेंड्यांसह आरोग्याला अपायकारक असणाऱ्या वस्तूंची भेसळ झाल्याचे दिसून येते. मात्र, प्रसार माध्यमांनी आवाज उठविला की संबधित यंत्रणा ‘झोपी गेलेला जागा झाला’ या म्हणीप्रमाणे तेवढ्या कालावधीत सारवासारव करताना दिसते. नंतर तेच काम सुरू असते. सध्या मार्केटिंग फेडरेशनकडून पुरविलेली चटणी ‘सुविधा’ या ब्रँडची आहे. एक किलो पॅकिंग अगदी नवीन आहे. मात्र, आता अक्षरश: काळेकुट्ट राखेसारखी चटणी आहे. तिला बुरशी आल्यासारखा वास असून, आमटी बनविली तर तिचा रंगही काळा होतो. ही आमटी बेचव व कुबट लागते की मुले ती तोंडातदेखील घेत नाहीत. या चटणीला शासन १७६ रुपये प्रति किलो देते. संपूर्ण जिल्ह्याला जवळजवळ ४८ ते ५० हजार किलो चटणी शालेय पोषण आहारासाठी लागते. त्यासाठी १७६ रुपये किलोप्रमाणे एकूण ८० लाख रुपये शासनाचे खर्च होतात. मात्र, निकृष्ठ दर्जाच्या शालेय पोषण आहाराच्या पुरवठ्याने शासनाच्या चांगल्या योजनेचाही बोजवारा उडत आहे. गरीब मुलांच्या तोंडात चार चांगले घास जाण्याला संबधित यंत्रणा व अधिकाऱ्यांच्या अर्थिक साटेलोट्याने ‘खो’ बसत आहे. यामुळे पालकांत प्रतिक्रिया उमटत आहेत.
शालेय पोषण आहारातील तिखट अत्यंत निकृष्ठ व मुलांचे आरोग्य बिघडविणारे आहे. पुरवठा केलेले तिखट प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना दाखवून जाब विचारला आहे. येत्या दोन दिवसांत त्यावर कारवाई झाली नाही तर करवीर तालुक्यातील सर्व तिखट जिल्हा परिषदेच्या दारात आपण ओतणार.
- राजेंद्र सुर्यंवशी, पंचायत समिती सदस्य
शालेय पोषण आहारातील चटणीने बनविलेली आमटी अत्यंत काळी, कुबट व बेचव असल्याने मुले ती खात नाहीत. खाल्ली तर मुलांना उलट्या करतात, असे तिखट पुरवठा करून मुलांच्या आरोग्यावर घाला घालणाऱ्या पुरवठादारावर कारवाई व्हावी.
- महादेव यादव, पालक, कसबा बीड, ता. करवीर
अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालाची प्रतीक्षा
या निकृष्ट दर्जाच्या तिखटाबाबत चौकशी केली असता याचे नमुने प्रथम अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठविले आहेत. मात्र, त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही, अशी माहिती मिळाली. अनेकवेळा हेच अन्न व औषध प्रशासन जागेवरच तपासणी करून संबंधितांवर कारवाई करते आणि जिल्ह्यातील हजारो बालकांच्या आरोग्याचा प्रश्न असताना जर याला विलंब होत असेल तर याला कारण काय? असा प्रश्न विचारला जातो आहे.