बाबासाहेबांच्या मूळ गावातील शिल्पसृष्टीला मुहूर्तच सापडेना!
By Admin | Updated: April 14, 2015 01:09 IST2015-04-14T01:09:38+5:302015-04-14T01:09:59+5:30
बाबासाहेबांच्या मूळ गावातील शिल्पसृष्टीला मुहूर्तच सापडेना!

बाबासाहेबांच्या मूळ गावातील शिल्पसृष्टीला मुहूर्तच सापडेना!
शिवाजी गोरे ल्ल दापोली
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी या दृष्टीने बाबासाहेबांच्या मूळ गावी आंबडवे येथे पाच कोटी रुपये खर्चून शिल्पसृष्टी उभी करण्याचा निर्णय २००९ ला आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, पाच वर्षे होऊन गेली तरी शिल्पसृष्टीचे नियोजन करण्यासाठी सरकारला मुहूर्तच मिळालेला नाही.
कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी २४ जून २००९ रोजी सिंधुदुर्ग येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित शिल्पसृष्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तत्कालीन ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी आंबडवे येथे भेट दिली. स्मारक व शिल्पसृष्टीसाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी केली असता सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीयांनी जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशेजारील ३६ गुंठे जागा शिल्पसृष्टीसाठी नियोजित करण्यात आली. शिल्पसृष्टीच्या जागेचा तिढा सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीयांनी सोडविला. १४ मार्च २०१२ ला तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी रत्नागिरी येथे बैठक बोलावली. या बैठकीत समिती स्थापन करण्यात आली. या बैठकीला स्थानिक ग्रामस्थ हजर होते.
सुदर्शन सपकाळ, नरेंद्र सपकाळ, नथुराम सपकाळ, अल्पेश सपकाळ (आंबेडकर) कुटुंबीय या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये लवकरच कामाला सुरुवात करण्याबाबत चर्चाही झाली. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा शासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे नथुराम सपकाळ यांचे म्हणणे आहे.
बाबासाहेबांच्या मूळ गावात भव्यदिव्य ग्रंथालय हवे आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची तसेच त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाची समाजातील प्रत्येक घटकाला, वाचकाला, अभ्यासकाला माहिती होण्याची गरज आहे. या ठिकाणी शिल्पसृष्टी झाल्यास येथे येणाऱ्या प्रत्येकाला बाबासाहेबांचा जीवनपट कळेल. बाबासाहेबांच्या मूळगावात सद्य:स्थितीत स्मारकाशिवाय काहीही नाही. त्यामुळे येथे येऊन काय पाहावे हाच प्रश्न अनुयायांना पडला आहे. आंबडवे गाव भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे मूळ गाव असल्याने देशविदेशातील पर्यटक या गावाला भेट देण्यासाठी येऊ लागले आहेत. येथे आल्यावर त्यांचे समाधान व्हावे, बाबासाहेबांच्या नावलौकिकाला साजेसे काम व्हावे, येथे येणारा कोणताही पर्यटक निराश होणार नाही याची जबाबदारी शासनाने घेणे गरजेचे आहे. आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब यांची भावकी आंबेडकर म्हणजे आताचे सपकाळ कुटुंबीय राहतात. बाबासाहेबांबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे. बाबासाहेबांसाठी आपले सर्वस्व त्याग करायला ते तयार असतात. बाबासाहेबांच्या उपक्रमासाठी लागणारी जमीन दान देऊन त्यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे. शिल्पसृष्टीसाठी ३६ गुंठे जागा देण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली; पण सरकारला मात्र या जागेवर शिल्पसृष्टी उभारण्यासाठी अजून मुहूर्त मिळालेला नाही.